गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर गावात विठ्ठलाई ग्रामविकास मंडळातर्फे घरगुती गौरी गणपतीचे सामुहिक विसर्जन केले जाते. या विसर्जन सोहळ्याच्या वेळी गावच्या सहाणेवर महिला पुरुष ठुमरी नृत्य म्हणजेच गोल फेर धरुन नाचतात. गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक ऐक्याने परंपरा जोपासण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे. Thumri Dance at Adur
गणेशोत्सवाच्या काळात आरत्या, महिला पुरुषांचे नाच असे कार्यक्रम कोकणातील सर्वच गावात वाड्यावाड्यांवर होत असतात. अडूर गावात मात्र गणेशोत्सवात मंडळाचे कार्यकर्ते तेली, न्हावी, कुणबी, कुंभार, सोनार, सुतार, गुरव आदी समाजातील 117 घरांमध्ये जाऊन विविध कार्यक्रम करतात. महिला देखील टिपरीनृत्य, जाखडी नृत्य करतात. त्यामुळे समाजासमाजामधील दरी, वाद बाजुला पडून एकात्मतेचे दर्शन घडते. Thumri Dance at Adur
गौरी गणपती विर्सजनाच्या वेळीही अडूर गावातील सर्व समाजातील 100 पेक्षा जास्त घरांतील मुर्ती गावच्या सहाणेवर एकत्र आणल्या जातात. सामुहिक आरतीनंतर उपस्थित ग्रामस्थ पारंपरिक ठुमरीनृत्य करतात. यावेळी परंपरेने चालत आलेली गाणी म्हटली जातात. दोन तास हा सोहळा रंगतो. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या नादात भजन गात मिरवणुकीने गणेशमुर्ती गाव तलावावर विर्सजनासाठी आणल्या जातात. सर्व मुर्तींचे विर्सजन झाल्यावर प्रसादाने सांगता होते. Thumri Dance at Adur
विठ्ठलाई ग्रामविकास मंडळाने पुढाकार घेत वर्षानुवर्षे सुरू असलेली ही प्रथा चालू ठेवली आहे. याशिवाय मंडळातर्फे गावात शिक्षण, क्रीडा, आरोग्य आदी विषयातील उपक्रमही राबविले जातात. संपूर्ण गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मंडळ काम करत आहे. – दिनेश खेडेकर, अडूर Thumri Dance at Adur