पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आठवण
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 31 : न्यायप्रिय, कुशल प्रशासक, अन्याय्य रुढी परंपरांचा तिटकारा असणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात 12 ज्योर्तिलिंगांपैकी 10 ज्योर्तिलिंगांची स्थापना असलेली देवालये, अयोध्या, मथुरा, व्दारका, जगन्नाथपुरी अशा शेकडो तीर्थक्षेत्री मंदिरे, धर्मशाळा, नदीघाट, विहीरींची उभारणी केली. त्या शिवभक्त होत्या. हेदवीतील उमा महेश्र्वराचे मंदिरासाठी ओक यांना निधी दिल्याचा इतिहास आहे. Temple of Uma Maheshwara in Hedvi
सतराव्या शतकात ओक घराणे हेदवीत आले. या ओक घराण्यातील रामचंद्र दीक्षित ओक किंवा विठ्ठल कृष्ण ओक यांच्यापैकी एक जण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महेश्र्वर दरबाराशी संबंधित होते. ते नोकरीस होते किंवा वतनदार होते किंवा अन्य कारणांनी होळकरांच्या दरबारी होते याची माहिती मिळत नाही. मात्र मध्यप्रदेशमधील काही गावांमध्ये आजही ओक आडनावाची घराणी रहातात. त्यांपैकी काहीजण गुहागरच्या श्री देव व्याडेश्र्वराला कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे ओक घराण्याचे होळकर यांच्या महेश्र्वर दरबाराशी व्यावहारिक किंवा व्यावसायिक संबंध होते या पुष्टी मिळते. तर विठ्ठल ओक किंवा रामचंद्र ओक यांनी गुहागर तालुक्यातील हेदवीत बस्तान बसविल्यावर सन 1785 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भेट घेतली. या संदर्भातील एक पत्र महेश्र्वर दरबारच्या पत्रांचे संग्राहक असलेल्या द.ब. पारसनीस यांच्याकडे आहे. या ओकांनी त्यावेळच्या भेटीमध्ये हेदवीच्या समुद्रकिनारी स्व मालकीच्या जागेत मंदिर बांधण्याची इच्छा प्रकट केली. शिवभक्त असलेल्या अहिल्यादेवींनी या प्रस्तावाला होकार दिला. तसेच एक हंडा मोहरा मंदिराच्या बांधकामासाठी दिल्या. याच निधीमधुन उमा महेश्र्वराचे मंदिर उभारण्यात आले. Temple of Uma Maheshwara in Hedvi
आजही दगडी बांधकामातील हे मंदिर हेदवीच्या समुद्रकिनारी दिमाखात उभे आहे. मंदिरात शंकराची पिंढी आणि उमादेवीची छोटी मूर्ती आहे. 1990 -1992 या काळात गावकऱ्यांनी हा मंदिरासमोर एक मोठा सभामंडपही बांधला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव पारंपरिक पध्दतीने येथे साजरा करण्यात येतो. मंदिराच्या समोर डोंगर पायथ्याशी बारमाही पाणी देणारा एक झरा आहे. तर मंदिराच्या मागे निसर्गाचा चमत्कार असलेली बामणघळ आहे. मंदिरापासून काही अंतरावर समुद्रकिनारीच हेदवीची स्मशानभुमी आहे. पूर्वी या स्मशानभुमीमुळे या परिसरात सायंकाळनंतर फारसे कोणी फिरकत नसे. आता मात्र हे मंदिर, बामणघळ पहाण्यासाठी अनेक पर्यटक येतात. Temple of Uma Maheshwara in Hedvi