मुंढर येथे डाँ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम
गुहागर, ता. 17 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु शालेय मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. या पार्श्वभूमीवर या मदत वाटपाचा कार्यक्रम रविवार दि. 18 आँगस्ट रोजी सिध्दीविनायक विद्यामंदिर, मुंढर येथे सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. Tatyasaheb Natu Pratishthan helps girls
डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थांबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासत आली आहे. गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रवाहात आणून त्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्यासाठी निवासाची सोय उपलब्ध करुन देऊन मोफत भोजनव्यवस्था करणे आदी सामाजिक कार्य सेवाभावी वृत्तीने जोपासत आहे. अशाच पध्दतीचा एक आगळावेगळा उपक्रम या संस्थेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार डाँ. विनय नातू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समाजामध्ये गरीब, होतकरु शालेय मुले आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या शिक्षण परवडत नाही. अशावेळी त्यांना मदती हात देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलींना आर्थिक मदत व त्यांच्या आईला साडी, चोळी वाटप असा हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाचा शुभारंभ व वाटप कार्यक्रम संपन्न होत आहे. Tatyasaheb Natu Pratishthan helps girls
चिपळूण तालुक्यातील ओमळी, नारदखेरकी, देवखेरकी, निर्व्हाळ, रावळगाव, उमरोली, कौंढरताम्हाने, बामणोली, बोरगाव, गुहागर तालुक्यातील चिखली, काळसूरकौंढर, मुंढर, अंजनवेल, रानवी, धोपावे, दाभोळ, पवारसाखरी, साखरी बुद्रुक आदी गावांतील मुलींचा या उपक्रमात समावेश आहे. एकूण 85 मुलींना हा लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला गुहागर दुर्गादेवी देवस्थानचे पदाधिकारी व नातू प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित राहणार आहेत. Tatyasaheb Natu Pratishthan helps girls