लेखक – चंद्रशेखर साने (लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.) ९३७००३७७७३
Guhagar News : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राकडून भारतीयांना लाभलेली दोन समकालीन नररत्ने. सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील वैचारिक देवघेवीविषयी मात्र खुद्द महाराष्ट्रातच बरेचसे अज्ञान आणि विपर्यास आहे. सावरकर आणि आंबेडकर यांची एकमेकांत भेटच झाली नाही, इथपासून जणू काही सावरकर आणि आंबेडकर दोघेही एकाच विचारपठडीतले नेते इथपर्यंत दोन टोकांची मांडणी केली गेली आहे. हा विमर्श खोटा आहे हे सांगणारी अनेक उदाहरणे इतिहासात नोंद आहेत. त्यापैकी काही उदाहरणे देवून या दोन नररत्नांचे नाते काय होते, त्यांच्यांत संवाद कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
आचार्य कै. बाळाराव सावरकर यांनी आपल्या साधार आणि ससंदर्भ लिहिलेल्या चार खंडात्मक सावरकर चरित्रात दिलेल्या माहितीवरून या दोन्ही महापुरुषांच्या राजकीय संबंधांवर आणि वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंधांवर बराच प्रकाश पडतो.
१. ऑगस्ट १९२९ मध्ये डॉ. आंबेडकर एका न्यायालयीन कामासाठी रत्नागिरीला येणार होते. विठ्ठल मंदिरात सावरकरांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे भाषण करायचे ठरले. ही कल्पना त्या काळात राबवणे अत्यंत कठीण होते. सावरकर अनुयायांनी यासाठी शेकडो सह्या जमवल्या. त्यावर सर्व जातीच्या लोकांच्या सह्या व अंगठे! मात्र, आंबेडकरांना तातडीने मुंबईला जावे लागल्याने हे भाषण झाले नाही. मात्र, त्या ठिकाणी दोघांची अर्धा तास भेट झाली. विरोधकांनी सावरकरांना तुम्ही आंबेडकरांना भाषण करू देण्यासाठी ५०० सह्या गोळा केल्यात. आम्ही ५००० सह्या विरोधात गोळा करू, असे सांगितले. अस्पृश्यता निवारणाचे काम त्यावेळी किती दुर्घट होते, ते यावरून लक्षात येते. (सावरकरांच्या सहवासात भाग-एक आ. ग. साळवी आणि रत्नागिरी पर्व पृ. १९७) Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
२. २८ जाने. १९३९ ला दादर येथे निवडणूक सभेत सावरकर आणि आंबेडकर या दोघांनीही एकाच व्यासपीठावरून भाषण केले. दोघांनीही रामभाऊ तटणीस यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत मते द्यावे, असे एकत्रित आवाहन केले. सावरकर-आंबेडकर यांच्या एकत्रित झालेल्या सभेत अध्यक्षस्थानी बॅ. जमनादास मेहता हे होते. (हिंदूमहासभा पर्व – १ पृ. १८०)
३. दि. ५ मे १९३९ साध्यानुकूल सहकार (Responsive Co-Operation) या आपल्या धोरणाला अनुसरून लंडनमधील भारतमंत्र्यांचे समादेशक आणि मध्य प्रांताचे माजी राज्यपाल डॉ. राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ हिंदूमहासभेने दिलेल्या उपहाराच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. या समारंभाला पालिका आयुक्त भट व हिंदूमहासभेच्या इतर सर्व नेत्यांसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा उपस्थित होते. या प्रसंगी सावरकर म्हणाले, “आजच्या परिस्थितीत हिंदूंचे प्रतिनिधी होण्यास डॉ. राव सर्व दृष्टीने योग्य आहेत. भारतासमोर लवकरच संघराज्य, महायुद्ध आदी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्या प्रसंगी डॉ. राव हिंदूहिताच्या दृष्टीने मत देतील,” असा विश्वास वाटतो. यास डॉ. राव यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शवला. सावरकरांनी राजकारण करताना ‘साध्यानुकूल सहकार्य’ हे धोरण स्वीकारले होते. म्हणजे जिथे जिथे साध्य एक असेल, तिथे तिथे अन्य काही बाबतींत मतभेद असले, तरीही त्या मुद्द्यापुरते सहकार्य, या धोरणास अनुसरून असलेल्या समारंभात डॉ. आंबेडकरांची सावरकरांबरोबरची उपस्थिती लक्षणीयच म्हणावी, अशी होती. हिंदूहित हे सावरकरांचे सर्वात प्राधान्य असलेले साध्य होते. (हिंदूसभा पर्व १ पृ. २१५-२१६) Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
४. सोमवार दि. ९ ऑक्टोबर, १९३९ ला सकाळी ११ ते १२ एक तास सावरकर व व्हाईसरॉय यांची भेट. सावरकरांच्या अथक प्रयत्नांमुळे आधी राजकारणात सहभाग न घेण्याचे कलम आपल्या उद्दिष्टांमध्ये असलेली हिंदूमहासभा दोन वर्षांतच काँग्रेसच्या हिंदूहितविरोधी आणि मुस्लीम तुष्टीकरणनीतीला विरोध करत एक महत्त्वाचा राजकीय पर्याय म्हणून उभा राहात होता आणि काँग्रेस आणि मुस्लीम लीगप्रमाणेच एक महत्त्वाचा पक्ष म्हणून मान्यताप्राप्त होऊ लागला होता. हिंदू पक्षाचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हॉईसरॉय काँग्रेस नेत्यांप्रमाणेच सावरकरांशीही स्वतंत्रपणे भेटीगाठी घेऊ लागले होते. या भेटीहून बाहेर आल्यावर तिथेच व्हाईसरॉयच्या भेटीसाठी आलेल्या डॉ. आंबेडकरांशी सावरकरांची भेट झाली. तिथेच काही वेळ सावरकर व आंबेडकर यांच्यात गप्पागोष्टी झाल्या. या भेटीत व्हाईसरॉयने काँग्रेस व मुस्लीम लीग प्रमाणेच हिंदूमहासभेलाही वाटाघाटींसाठी निमंत्रण देण्याचे मान्य केले.(हिंदूसभा पर्व १ पृ. २७६)
५. यानंतरची सावरकर-आंबेडकर यांची भेट १३ जानेवारी, १९४० ला सावरकरांच्या घरीच झाली. ‘सावरकर सदन’ या नावाने सावरकरांचे दादरमधील घर आजही प्रसिद्ध आहे. या प्रसंगी सावरकरांची प्रकृती ठीक नव्हती, म्हणून ते घरीच राहून कार्यालयाची कामे पाहात होते. त्यावेळी डॉ. आंबेडकर आणि आचार्य दोंदे हे दोघेही सावरकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास सावरकर सदनमध्ये येऊन भेटले. हिंदूंवर सीमाप्रांतात होणार्या आक्रमणांचा प्रतिकार कसा करावा, या संबंधात सावरकरांनी प्रकृतीअस्वास्थ्य बाजूला ठेऊन ९ जानेवारी, १९४० ला रामभाऊ तटणीस यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीनंतर जीना-सावरकर यांच्यातील भेटीचीही चर्चा सुरू झाली. पण या वार्तेत तथ्य नसल्याचे ‘केसरी’ने प्रसिद्ध केले. ‘मी हिंदूंचा प्रतिनिधी असून मला जीनांकडे काहीही मागायचे नाही, त्यांना हवे असल्यास त्यांनी माझ्याकडे यावे,’ अशी सावरकरांची भूमिका होती. राजकारणात कोण कोणाला भेटतो, याला खूप अर्थ असतो. गांधी जसे जीनांकडे हेलपाटे मारतात, तसे आपण कदापि करणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. सावरकर-आंबेडकर यांच्यात मात्र मित्रत्वाच्या भेटीगाठी होत होत्या, हे आतापर्यंत दिलेल्या दिनांकवार माहितीवरून सहज लक्षात येईल. (हिंदूसभा पर्व -१ पृ. ३०४) Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar


६. यानंतर सावरकर-आंबेडकरांच्यातील पुढील भेटीचा दिनांक बाळाराव सावरकरांनी नोंदवला आहे, तो ६ फेब्रुवारी, १९४०! या दिवशी पारशी समाजाची एक सभा झाली. त्या सभेला सावरकर उपस्थित राहिले. जीनांना न भेटणारे सावरकर अत्यल्पसंख्य पारशी समाजाशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध राखून होते. या सभेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरही सावरकर बंधूंसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले. सावरकर-आंबेडकर आणि विविध पारशी नेते आणि हिंदूमहासभेचे पुढारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, “कोणत्याही राष्ट्रीय कार्यात नि राज्यकारभारात अल्पसंख्य जमातींना योग्य तो वाटा देण्यास हिंदूमहासभा सिद्ध आहे. आज काँग्रेसचे निवडून गेलेले प्रतिनिधी अधिक आहेत हे खरे, पण हिंदूमहासभेचे अनुयायी आणि सभेला पाठिंबा देणारे त्यांच्याहून अधिक आहेत. मुसलमानांना आता हिंदुस्थान हिंदूंचा आणि मुस्लिमांचा असे देशाचे दोन तुकडे करायचे आहेत. इतर अल्पसंख्याकांनी हिंदुस्थान तोडण्याच्या मुसलमानांच्या मागणीशी गट्टी करू नये. याच सभेत सावरकरांप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनीही भाषण केले. (सकाळ ७-२-१९४०) या सभेचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्येही छापून आले होते. यापूर्वी २२ जानेवारीला सावरकरांनी पारशी समाजाच्या नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केली होती. २५ जानेवारी, १९४०ला सावरकर आणि सेनापती बापट यांनी पुन्हा पारशी नेत्यांशी चर्चा केली होती. (हिंदूसभा पर्व – १ पृ. ३०८-३०९) Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
प्र. के. अत्रे या काळात गांधी-काँग्रेस भक्त आणि सावरकरांचे कट्टर विरोधक होते. त्यांनी ‘नवयुग’मधून सावरकर-आंबेडकर यांच्यातील एकत्र येऊन राजकारण करण्यावर सडकून टीका केली. (हिं.स. पर्व पृ. ३११) त्या वर्षी झालेल्या निवडणुकांत हिंदूसभा, सनातनी, आर्यसमाजी व आंबेडकरांच्या स्वतंत्र श्रमिक पक्ष व लिबरल पक्ष या सर्वांनी एकमेकांना जमेल तेवढे सहकार्य करून निवडणुका लढवल्या व बहुतांशी ठिकाणी त्यांचा विजय होऊन काँग्रेसचा पाडाव झाला. यावर हिंदूविघातक काँग्रेसचा पाडाव शक्य आहे, हे या निवडणुकांनी दाखवून दिले, अशी सावरकरांनी प्रतिक्रिया दिली. (हिं.स.प. १ पृ. ३२०)
७. सावरकर आणि आंबेडकरांची पुढील भेट १७ एप्रिल १९४०च्या सुमारास चुनीलाल मेहता यांच्या घरी झाली. चुनीलाल यांच्या घरी भरलेल्या काँग्रेसेतर पक्षांच्या या सभेला स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर तसेच रँग्लर र. पु. परांजपे उपस्थित होते. या सभेत एक काँग्रेस विरोधी आघाडी निर्माण करावी, यावर चर्चा करण्यात आली. (हिं.स.पर्व-१- पृ. ३२८) Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
८. दि. १४-१५ मार्च १९४१ ला मुंबईत ताजमहाल हॉटेलमध्ये काँग्रेस व मुस्लीम लीग वगळून अन्य पक्षांची बैठक भरली. त्यात सुमारे ४० नेते उपस्थित होते. ही एक अतिशय महत्त्वाची बैठक असून यात सावरकरांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. आंबेडकरही सावरकरांसमवेत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला विशेष मार्गदर्शन सावरकरांनी केल्याने त्यांचा आभाराचा विशेष उल्लेख अध्यक्ष बॅ. सप्रू यांनी केला. या काळात ब्रिटनचा द्वितीय विश्वयुद्धात सर्वत्र सारखा पराभव होत होता. या परिषदेने अनेक ठराव संमत केले. युद्ध संपताच ब्रिटनने हिंदुस्थानला वसाहतीचे स्वातंत्र्य त्वरित द्यावे, ही मागणी करण्यात आली. या परिषदेवर सावरकरांचा मोठा प्रभाव पडला. या परिषदेचे प्रतिवृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला २६ मार्च १९४१ रोजी प्रसिद्ध झाले असून हे ठराव जर प्रत्यक्षात आले तर ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली हिंदूराज्यच स्थापन होईल, असा संताप ‘टाइम्स’ने व्यक्त केला, तर या परिषदेवर कोणत्या कवी कालिदासाचा हात फिरला आहे?, असा सवाल ‘फ्री प्रेस जर्नल’ने केला. (अखंड हिंदुस्थान लढा पर्व पृ. १८-१९) या परिषदेनंतर जीना सावरकरांना भेटण्यास उत्सुक असल्याच्या वार्ता झळकत होत्या. आंबेडकरही सावरकर-जीना भेट व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. ती भेट मात्र शेवटपर्यंत झालीच नाही. Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
९. सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांचे हिंदू-मुस्लीम समस्येविषयी एकमत होते. पण समस्या कशी सोडवावी, याविषयी खूप मोठी मतभिन्नता होती. त्याविषयी सविस्तर चर्चा करूच. पण त्याच सुमारास आंबेडकरांचे ‘पाकिस्तान’ अर्थात भारताची फाळणी हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकासंबंधी मद्रास येथील ‘हिंदू’च्या वार्ताहरांनी सावरकरांना प्रश्न विचारले. ती प्रश्नोत्तरे व वृत्त ‘हिंदू’च्या २८ फेब्रुवारी १९४१च्या अंकात प्रसिद्ध झाली. यावेळी सावरकर म्हणाले, “हे पुस्तक प्रसिद्ध करताना डॉ. आंबेडकरांनी आपल्याशी चर्चा केली होती.” यावरून सावरकर आणि आंबेडकरांच्या आणखीही न नोंदलेल्या भेटीगाठी होत असत, असे दिसते.
१०. दि. २६ जुलै १९४१ला ७५ पुढार्यांची पुण्यात बैठक झाली. त्या परिषदेत सावरकरांचे वैशिष्ट्यपूर्ण भाषण झाले. यावेळी डॉ. राधाकृष्णन, बॅ. जयकर, सर विश्वेश्वरय्या, मिझ इस्माईल, सप्रू अशा इतर अनेक पुढार्यांबरोबर आंबेडकरांचीही उपस्थिती होती. या परिषदेला दुपारी गोखले सभागृहात प्रारंभ झाला. सावरकर मुंबईहून सभास्थानी पोहोचताच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. (अखंड हिंदुस्थान लढा पर्व पृ. १३६) ही परिषद संपल्यावर सावरकर पुढे सांगली येथे गेले. सांगली स्थानकावर सहस्त्रावधी लोक सावरकरांच्या स्वागताला उभे होते. Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar
११. दि. ११ एप्रिल १९४३ला सावरकर दिल्लीत होते. त्यावेळी त्यांनी हिंदूसभा भवनात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. हिंदूमहासभा पक्षांतर्गत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे एक सदस्य असल्याने त्या संदर्भात सावरकरांनी डॉ.आंबेडकरांशी एक तास विचारविनिमय केला. (अ. हिं. लढा पर्व पृ. १९४)
या सर्व ससंदर्भ माहितीवरून सावरकर-आंबेडकर यांची कधी भेटच झाली नाही, हा अपप्रचार आणि त्यावर दोघांमधील विरोधाचा काल्पनिक डोलारा उभे करणे किती चुकीचे आहे, हे सहज लक्षात येईल. निश्चितपणे दोघांमध्ये काही विषयांत सहकार्य असले तरी मतभेदही होते. पण ते त्याच पातळीवर चर्चा करून समजून घेतले पाहिजेत. Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar