लांजा, ता. 29 : वेरळ येथील श्री क्षेत्र लक्ष्मीकेशव मंदिरात श्री लक्ष्मीकांत कार्तिक उत्सव साजरा होत आहे. या उत्सवात शनिवारी (ता. ३०) वेरळचे सुपुत्र गायनाचार्य कै. पंडित राजारामबुवा पराडकर यांना ‘संगीतमय सुमनांजली’ सादर करण्यात येणार आहे. उत्सव आणि संगीतमय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. Singing program at Veral
या वर्षीच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे २०२४ हे वर्ष हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज गायनाचार्य, श्रेष्ठ गुरु, प्रख्यात संगीतज्ञ आणि महान गायक (कै.) पंडित राजारामबुवा पराडकर यांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मूळ वेरळ गावचे रहिवासी असलेल्या पराडकर कुटुंबीय व देवस्थान समिती यांच्यातर्फे यंदाचा उत्सव साजरा होत आहे. Singing program at Veral
वेरळचे सुपुत्र गायनाचार्य (कै.) पंडित राजारामबुवा पराडकर यांना संगीतमय सुमनांजली वाहण्यात येईल. हा सांगीतिक कार्यक्रम शनिवारी ३० नोव्हेंबरला रात्री ९.३० वाजता होणार आहे. यात पराडकर घराण्यातील गायक आणि पं. राजारामबुवा पराडकर यांचे सुपुत्र व शिष्य आणि पद्मभूषण, श्रेष्ठ भारतीय शास्त्रीय संगीत गायक स्व. पं. सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ शिष्य सुप्रसिध्द गायक, सूरमणी पं. श्रीपाद पराडकर, त्यांची कन्या, प्रसिध्द शास्त्रीय संगीत गायिका सौ. दीपा पराडकर- साठे आणि चिरंजीव ललित पराडकर या तिघांचे गायन होणार आहे. त्यांना राजू धाक्रस (तबला), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), मंगेश चव्हाण (पखवाज), अद्वैत मोरे (तालवाद्य) साथसंगत करतील. या कार्यक्रमास संगीतप्रेमी रसिकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Singing program at Veral
या उत्सवात मंत्र जागर, आरती, भोवत्या आणि किर्तन इत्यादी कार्यक्रम रोज रात्री ८.३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत होणार आहेत. दररोज रात्री ह. भ. प. दत्तात्रय उपाध्ये यांची किर्तन सेवा. त्यांना संवादिनी साथ विद्याधर अभ्यंकर व तबलासाथ किरण लिंगायत करणार आहेत. रविवारी १ डिसेंबरला उत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी सायंकाळी दीपोत्सव, ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यानंतर श्रींची सेवा केली जाईल. या कार्यक्रमाला वेरळ गावासह भाविकांनी व रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. Singing program at Veral