राजेश बेंडल; ना. उदय सामंत यांनी केले स्वागत
गुहागर, ता. 23 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेत सक्रिय झालो आहे. कुणबी समाजाला ज्यांनी न्याय दिला त्यामुळे विधानसभेला गुहागर मधून मला संधी मिळाली तर मी ती विधानसभा निवडणूक नक्की लढणार, असे प्रतिपादन राजेश बेंडल यांनी पत्रकारांसमोर केले. Rajesh Bendal was welcomed by Samant
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, कुणबी समाजासाठी महायुती सरकारने आणि विशेषता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रेरित होऊन गुहागरचे राष्ट्रवादीचे नेते राजेश बेंडल यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आला तर श्री बेंडल तिथले उमेदवार असतील. त्यांना उमेदवारी मिळाल्यास कुणबी आणि बहुजन समाजाला न्याय मिळेल. श्री राजेश बेंडल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उभाटा पक्षाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. यावेळी राजेश बेंडल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सामंत म्हणाले राजेश बेंडल हे गेली 25 वर्ष राजकारणात आहेत. गुहागर नगरपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व जागा आणि नगराध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे. त्या भागात त्यांचे मोठे समाजकार्य आहे. विशेष करून कुणबी समाज आणि बहुजन समाजासाठी ते सक्रिय आहेत. Rajesh Bendal was welcomed by Samant