ग्रामस्थांचा आरोप; उपठेकेदाराकडे अनेक कामे
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील पाटपन्हाळे जलजीवन मिशन योजना केवळ ठेकेदारामुळे बारगळ्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मुख्य ठेकेदाराने सब ठेकेदार नेमून ग्रामस्थांची बोळवण केलीच शिवाय नेमलेल्या सब ठेकेदाराने असंख्य ठिकाणी कामे घेतल्याने या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. या योजनेचे काम अद्याप सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी गुहागर पंचायत समितीकडे कारवाईची मागणी केली आहे. Patpanhale Jaljeevan Yojana
पाटपन्हाळे भेकरेवाडी व गणेशवाडीसाठी मंजूर झालेली ५१ लाखाच्या जलजीवन मिशन योजनेचे काम करणाऱ्या राजू नामक सब ठेकेदाराने काम बारगळ्याचे एखादे कारण पुढे करुन वेळ मारुन नेली आहे. ३ महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या या योजनेचे काम अजूनही सुरु झालेले नाही. उन्हाळ्याचे तीनही महिने वाया गेले. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मात्र अजूनही ठेकेदाराला पाणी योजनेचे काम सुरु करता आलेले नाही.
याविषयी ठेकेदाराला विचारणा केली असता, योजनेसाठी एका विशिष्ट नामांकीत कंपनीचा पाईप हवा असा काहींचा अट्टाहास असल्याने ती बारगळ्याचे कारण त्याने सांगितले होते. वास्तविक असे जर कारण होते मग ठेकेदाराने आमच्याशी बसून का चर्चा केली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांची दिशाभूल करुन वेळ मारुन नेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. Patpanhale Jaljeevan Yojana
शृंगारतळी समर्थनगरवासियांचीही तक्रार
पाटपन्हाळे कार्यक्षेत्रातील शृंगारतळी समर्थनगर येथील रहिवाशांना मुबलक पाणी मिळावे यासाठी ग्रा. पं. पाटपन्हाळेकडून १५ वा वित्त आयोगातून सुमारे ९ लाखाच्या पाणी योजनेसाठी तरतूद करण्यात आली. यातील ५० टक्के रक्कम या राजूनामक सब ठेकेदाराने उचलही केली. मात्र या योजनेचे काम अर्धवट ठेवल्याने येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यांनी काही प्रमाणात केलेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. Patpanhale Jaljeevan Yojana