गुहागर, ता. 11 : या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे निसर्गदत्त प्रतिभा लाभलेल्या निसर्गकवी ना.धो. महानोर यांच्या कवितांचा श्रावण या कवितेतील हे काव्य मनाला आजही भावते. खरोखरच अशी अद्भुत किमया हिरव्या श्रावणाने साधली आहे. काळ्या रंगाच्या कातळावर निळ्या रंगाची सीतेची आसवे (डोळे) बहरलेली दिसून येत आहेत. जणूकाही श्रावणात ही आसवे वस्तीलाच आली असून येथे एकत्र नांदताना दिसत असल्याचे मनमोहक दृश्य डोळ्यांचे पारणे फिटणारे ठरले आहे. Katalmal is decorated with wildflowers
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावांच्या माळरानावर गावराखा मंदिराच्या कातळांवर सीतेची आसवे बहरुन आली आहेत. सीतेची आसवं हे फुल आहे. युट्रीक्युलारीया म्हणजेच ‘सीतेची आसवे’. त्या फुलाच्या रंगरूपाला गोडवा आणणारं त्याचं नावही तितकच अस्सल मराठमोळं. सह्याद्रीच्या खडकाळ पठारांवर उगवणारी, बोटभर उंचीची आणि नखभर फुल मिरवणारी ही वनस्पती मांसाहारी आहे हे त्या फुलाकडे पाहून पटणं, निदान पहिल्या भेटीत तरी अशक्यच. कीटकभक्षी वनस्पती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर चिकट द्रावाचे द्रोण भरलेल्या वनस्पती येतात. पण ही वनस्पती जराशी वेगळी आहे. म्हणजे या वनस्पतीच्या मुळांवर सुक्ष्म छिद्र आणि दाट केस असलेल्या पिशव्या असतात. या पिशव्या म्हणजे जणू जठरच. या पिशव्यांमधून अतिसुक्ष्म कीटक अडकतात आणि पचवलेसुद्धा जातात. Katalmal is decorated with wildflowers


उघड्या खडकावर, कातळावर, जांभ्या दगडाच्या सच्छिद्र दगडांवर ही वनस्पती उगवते. मुळात सड्यावर माती कमी आणि त्यामुळे आवश्यक क्षार, नत्र वगैरेही कमी. ही कमी भरून काढण्यासाठी कीटक भक्षण केले जाते. उन्हाळ्यात भकास वाटणार्या खडकांच्या कुशीत अशा अनेकविध चिंटूपिंटू वनस्पतींची सुक्ष्म बीजं लपलेली असतात. या बीजांना अंकुरण्यासाठी त्यांचं घर सुरक्षित राखणं हे आपले कर्तव्य असते. कारण पावसाळ्यात या बीजांना अंकुर फुटून त्यांना फुलण्यास श्रावणमास भर घालीत असतो. श्रावण मासातील रंगीबेरंगी रानफुलांचे हे वैभव टिकविण्यासाठी आपल्याला गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. जंगलतोड, ओसाड माळरानावरील वणवे अशा कितीतरी कृत्ये प्रत्यक्षरित्या मानवाकडून घडून येत आहेत. त्यामुळे निसर्गातले हे सौंदर्य नष्ट होत चालले आहे. ते टिकविण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. Katalmal is decorated with wildflowers