गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने एक दिवशीय मुलाखत कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरी करावी लागते अशावेळी त्यांना मुलाखतीला सामोरे जावे लागते त्याची तयारी महाविद्यालय स्तरापासूनच व्हावी तसेच कोकणातील विद्यार्थी हुशार असतात तसेच विविध गुण त्यांच्याकडे असतात परंतु पुरेशा आत्मविश्वासाअभावी आणि तयारी अभावी विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीला गेल्यानंतर ते मुंबई आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत नक्कीच मागे पडतात ही कमतरता दूर व्हावी यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते. Interview skill development workshop
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पातळीवरील मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहणारे आणि विविध खाजगी कंपन्यांमध्ये 32 वर्षाचा अनुभव असणारे श्री नरहर देशपांडे (ठाणे) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या मुलाखतीची प्रक्रिया सविस्तर स्पष्ट केली. खाजगी कंपन्यांना मुलाखत देणाऱ्या उमेदवाराकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा असतात याची माहिती सुरुवातीला दिली. मुलाखतीला जाताना विद्यार्थ्याने आपला बायोडाटा कसा तयार करावा तसेच आपली फाईल कशी तयार करावी याची माहिती देऊन प्रत्यक्ष मुलाखतीच्या दरम्यान कोणकोणत्या गोष्टी होतात. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मुलाखतीच्या वेळी समय सूचकता कशाप्रकारे दाखवावी तसेच हजरजबाबीपणा कशाप्रकारे आपण दाखवू शकतो हे विविध उदाहरणाच्या आधारे त्यांनी स्पष्ट केले. मुलाखतीच्या दरम्यान आपला आत्मविश्वास कायम राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येतील आणि मुलाखत ही आपल्या बाजूने कशी सकारात्मक करता येईल हे त्यांनी सांगितले तसेच मुलाखतीच्या वेळी आपला ड्रेस कोड काय असावा आणि कोणत्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. Interview skill development workshop
कार्यशाळेच्या शेवटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुलाखती संदर्भात आपले विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस एस खोत यांनी केले. या कार्यक्रमाचे वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई तसेच वाणिज्य विभागाचे प्रा. कांचन कदम आणि प्रा. सुभाष घडशी उपस्थित होते. Interview skill development workshop