गुहागर, ता. 16 : गुहागर मतदारसंघात उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला गेल्यामुळे भाजपने आधीपासूनच नाराजीचा झेंडा फडकावला होता. दरम्यान, आजवर पाचवेळा आमदार झालेले भास्कर जाधव सहाव्यांदा जिंकून जिल्ह्यात सर्वाधिकवेळा आमदार होण्याचा विक्रम करणार की, यावेळी त्यांचा रथ महायुती अडवणार का? हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. Guhagar assembly polls
अनेक वर्षे गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. येथे शिवसेनेची ताकदही मोठी आहे. त्यामुळे २००९ पर्यंत बहुतांशवेळा हा मतदारसंघ युतीकडे होता. मात्र २००९ साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि येथील राजकीय समीकरणे बिघडली. त्यावर्षी शिवसेनेकडून रामदास कदम आणि भाजपकडून अपक्ष म्हणून विनय नातू यांनी ही निवडणूक लढवली आणि चिपळूणहून गुहागरला गेलेले भास्कर जाधव पहिल्यांदा विजयी झाले. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुका ते विजयी झाले. दोन निवडणुका राष्ट्रवादीकडून तर २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. Guhagar assembly polls
२००९ आणि २०१४ मध्ये नातू आणि जाधव आमनेसामने होते. जाधव यांनी नातूंना पराभूत केले. आता महायुतीत भाजपला ही जागा हवी होती. मात्र ती शिंदेसेनेला मिळाली आणि राजेश बेंडल येथे निवडणूक लढवत आहेत. आता नाराजी सोडून भाजपने त्यांच्यासाठी काम केले तर शिंदेसेनेला फायदा आणि काम नाही केले तर भास्कर जाधव यांना फायदा होईल, अशी भाजपची स्थिती आहे. त्यामुळे गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भास्कर जाधव यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मात्र राजेश बेंडल यांचे समाजातील कामही मोठे आहे. आता मतदार काय ठरवतात, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. Guhagar assembly polls