रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने नाराजी नाट्यावर पडदा, महायुतीच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ
गुहागर, ता. 11 : उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी झटकून पुन्हा एकदा महायुतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्या चिपळूणातील सभेत महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमुखी एकजूट होऊन आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते अॅक्टिव्ह मोड मध्ये आलेले दिसत आहेत. BJP active in Guhagar
गुहागरमधून भाजपला उमेदवारी न मिळाल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. भाजपने गुहागर मतदारसंघात यापूर्वीच प्रचार केला होता. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत आपली निशाणी पोहचविली होती. मात्र, अचानक महायुतीतील शिंदे गटाला उमेदवारी मिळाल्याने नाराजी कार्यकर्त्यांमध्ये पसरली होती. एकप्रकारे मरगळ आली होती. त्यातच भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे भाजपची मते विभागली जाणार अशी भिती महायुतीतील घटक पक्षांना वाटत होती. मात्र, त्यांचीही मनधरणी करण्यात भाजपा नेत्यांना यश आले. जैतापकरांनी अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. BJP active in Guhagar
या सर्व राजकीय घडामोडीत भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी चिपळूण येथे येऊन महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभा घेऊन नाराजीचा पडदा बंद केला. सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून चव्हाण यांनी महायुतीत कोणतीही फूट, नाराजी नसल्याचे सर्वपक्षियांना दाखवून दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना सक्रीय होण्याचा सल्ला देण्यात आला. BJP active in Guhagar
गुहागरमध्ये भाजपची प्रचार यंत्रणा यापूर्वीच बांधली गेली आहे. बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्याशी संवाद होऊन त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. प्रत्येकजण गाव पातळीवर महायुती उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. स्वतः माजी आमदार डाँ. विनय नातू लक्ष ठेवून आहेत. कार्यकर्त्यांकडून नियमित प्रचाराचा आढावा घेण्यात येत असून पदाधिकाऱ्यांकडे प्रत्येक गटाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एकूणच महायुतीत एकजूट झाली असून उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वांनीच कंबर कसलेली दिसून येत आहे. BJP active in Guhagar