निवडणूक अधिकारी गायकवाड; मतदार नोंदणी २८ मे पर्यंत
रत्नागिरी, ता. 28 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दिनांक 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी, जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारक यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केले आहे. Graduate Election Voting
भारत निवडणूक आयोगाने 24 मे, 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मुदत दिनांक 7 जुलै, 2024 रोजी समाप्त होणार आहे. या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 31 मे, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 7 जून, 2024 (शुक्रवार),नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 10 जून, 2024 (सोमवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 (बुधवार), मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार), मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजता, मतमोजणीचा दिनांक 1 जुलै 2024 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 5 जुलै 2024 (शुक्रवार). दिनांक 24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. Graduate Election Voting


कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 भरुन सादर करावयाचा आहे.भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दिनांक 28 मे, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने करण्याची असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. सदर मतदार यादी ही नव्याने तयार करण्याची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. सदर नमुना नं. 18 हस्तलिखित / टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 पुढील ठिकाणी सादर करता येईल. संबंधित तहसिलदार कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतील. Graduate Election Voting