गुहागर न्यूजचा उपक्रम, प्रशासनाच्या सहकार्याने तालुक्यात होणार संकलन
गुहागर, ता. 28 : येथील पोलीस परेड मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभानंतर गुहागर तालुक्यातील इ कचरा संकलनाच्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गटविकास अधिकारी केळस्कर, गुहागर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण आणि लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष अनिकेत गोळे आदींच्या हस्ते इ कचरा नगरपंचायतीच्या घंटागाडीत टाकण्यात आला. E-waste collection


गुहागर न्यूजतर्फे इ कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. सध्या शासनाद्वारे शहरी आणि ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान सुरु आहे. त्यातही इ कचरा संकलनाचा विषय असल्याने गुहागरच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपंचायतीने या उपक्रमाला आणखी बळ दिले. त्यामुळे आता गुहागर न्यूजच्या इ कचरा संकलनाचे अभियान तालुक्यात होणार आहे. या अभियानामध्ये नादुरुस्त झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. ज्यामध्ये जुने मोबाईल, टॅब, मोबाईल चार्जर, इयरफोन, पॉवरबँक, लॅपटॉप, कॉम्युटर (स्क्रीन, सीपीयु, किबोर्ड, माऊस, मदरबोर्ड, प्रिंटर, टोनर, स्कॅनर, केबल), सर्व प्रकारचे टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टीम, रेडिओ, कोविड काळात वापरलेले ऑक्समिटर, श्रवणयंत्रे, स्मार्ट वॉच आदी इ कचरा शहरी आणि ग्रामीण भागातून संकलित करण्यात येणार आहे. E-waste collection


या अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी गुहागरच्या पोलीस परेड मैदानावर झाला. गुहागर शहरात इ कचरा संकलनासाठी फिरविण्यात येणाऱ्या घंटागाडीचा समावेश संचलनात करण्यात आला होता. संचलन झाल्यानंतर ही घंटागाडी मैदानाच्या मध्यभागी उभी करण्यात आली. मयूरेश पाटणकर यांनी यावेळी अभियानाची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर तहसीलदार, पोलीस निरिक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, लायन्स क्लबचे सदस्य यांनी प्रातिनिधीक स्वरुपात नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू घंटागाडीत टाकल्या. गुहागर नगरपंचायत क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक रविवारी इ कचरा संकलनासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. गुहागर शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील दुकानातील कचरा रविवारी घंटा गाडीत द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले. E-waste collection


26 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतींमार्फत इ कचरा संकलनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच गावागावात संकलन केंद्र तयार केली जाणार आहेत. 15 ते 23 फेब्रुवारी या काळात ग्रामीण भागात इ कचरा संकलीत करण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायत कर्मचारी, सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना यांचे सहकार्य मिळणार आहे. त्यासाठीचे नियोजन गटविकास अधिकारी केळस्कर करीत आहेत. शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांनी आपल्याकडील इ कचरा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या संकलन अभियानात द्यावा. असे आवाहन तहसीलदार परिक्षित पाटील यांनी केले आहे. E-waste collection