गुहागर वरचापाट, मोहल्ला, बाग परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा
गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील वरचापाट, मोहल्ला, बाग परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला कळवूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. येत्या दोन दिवसात पिण्याचे स्वच्छ पाणी न आल्यास याचा जाब विचारण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगरपंचायतीवर धडकण्याचा इशारा दिला आहे. Dirty water supply to citizens
शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील वरचापाट, मोहल्ला आणि बाग परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही गुहागर नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या पाण्याबाबत मंगळवारी नागरिकांनी प्रशासकीय अधिकारी श्री. वानखेडे यांना जाब विचारत तत्काळ पिण्यायोग्य पाणी व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य केली आहे. या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नसल्याने येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र पायपीट करावी लागत आहे. नगरपंचायत प्रशासन नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी न दिल्यास तेच दूषित पाणी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी आणू, असा इशारा शिवसेना शहर संघटक राकेश साखरकर यांनी दिला आहे. Dirty water supply to citizens
यावेळी भंडारी समाज सचिव श्री. निलेश अ. मोरे, माजी नगरसेवक श्री. उमेश भोसले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. संगम मोरे, माजी ग्रा. सदस्य शशिकांत नरवणकर, शिवसेना उबाठा श्री. समीर कनगुटकर दिपक म. मोरे आदी उपस्थित होते. Dirty water supply to citizens