गुहागरचे पोलीस निरीक्षक मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आग्रही
गुहागर, ता. 04 : गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पोलीसांकडून पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना दिली जाणारी वागणूक हा गेले काही महिने वादाचा विषय बनला आहे. या वादात उतरत माजी आमदार डॉ. विनय नातूंनी गुहागर पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले. प्रसंगी गृहमंत्र्यांपर्यंत पोचण्याचा इशाराही दिला. त्याचवेळी पर्यटकांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशी ठाम भूमिका पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी घेतली आहे. Crowd of tourists at Guhagar Beach
नाताळची सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक गर्दी करतात. दिवसभर विविध पर्यटनस्थळे पाहून झाल्यावर सायंकाळी समुद्रचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र सायंकाळी 6 नंतर पाण्यात असलेल्या पर्यटकांना पोलीस प्रशासन बाहेर काढते. काहीवेळा सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान समुद्रात पोहायला जाणाऱ्या पर्यटकांना पोलीस अडकवतात. यामुळे डिसेंबर अखेरीला आलेल्या काही पर्यटकांनी गुहागरमधील बुकींग रद्द केले. दिवाळीच्या सुट्टीतही असाच प्रकार घडला होता. चित्रीकरणासाठी आलेल्या टिमला देखील मध्यंतरी असाच पोलीसांचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक नाराज आहेत. हे असेच सुरु राहीले तर गुहागरातील पर्यटन व्यवसायाला दिर्घकाळ फटका बसेल अशी भिती पर्यटन व्यावसायिकांना वाटत आहे. Crowd of tourists at Guhagar Beach
विधानसभा निवडणूक संपल्यावर भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी गावभेट दौरे सुरु केले. त्यावेळी तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांनी याबाबतची तक्रार डॉ. नातूंकडे केली. सातत्याने आलेल्या तक्रारींबरोबरच एका पर्यटन व्यावसायिकाने त्याला पोलीस प्रशासनाने पाठवलेली नोटीसही डॉ. नातूंना दिली. यानंतर मात्र डॉ. विनय नातूंनी या वादात थेट उडी घेतली. त्यांनी व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी सर्वसामान्य जनतेला कलम 168 च्या नोटीसा देण्याचे बंद करावे. गुहागरमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिलेल्या नोटीसीमध्ये पोलीस अधिक्षकांच्या लेखी नोटीस देण्याच्या आदेशाबाबत असा उल्लेख आहे मात्र तारीख वार असा तपशील दिलेला नाही. तसेच नववर्ष, 31 डिसेंबर, मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलन असाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र आरक्षण, आंदोलन कुठेही सुरुच नाही. याचा अर्थ हेतुपुरस्सर नोटीस देण्याची यांची मानसिकता आहे. अशाप्रकारे पर्यटन व्यावसायिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना विनाकारण नोटीसी देण्याचे काम पोलीसांनी करु नये. पोलीस व शासकीय यंत्रणांनी पर्यटन व्यवसाय वृध्दीकरता, साधन वृध्दीकरता काम केले पाहीजे. परंतू गुहागरातील पोलीस अधिकारी विनाकारण पर्यटकांना त्रास देतात. पर्यटन व्यावसायिकांना नोटीसा पाठवतात. सहानंतर समुद्र किनाऱ्यावर थांबूच नये यासाठी प्रयत्न करतात. या गोष्टींमुळे अनेक पर्यटकांनी गुहागर तालुक्यातील बुकींग बंद केले. रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळा न्याय केला जाणार असेल तर जिल्ह्याचा पर्यटन वाढीचा विकास थांबेल. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अन्यथा गृहमंत्र्यांकडे जावून आम्हांला तक्रार करावी लागेल. प्राध्यापकांवर हल्ले झाले तर रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद होत नाहीत. मात्र समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक थांबले तर त्यांना हुसकावून लावण्याचे काम पोलीस करतात. याबाबत वरिष्ठांनी पोलीस प्रशासनाला सूचना करण्याची आवश्यकता आहे. Crowd of tourists at Guhagar Beach
पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची
डॉ. नातूंच्या व्हिडिओचा संदर्भ घेवून बोलताना गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत म्हणाले की, गेल्या काही महिन्यात जयगड, गणपतीपुळे, देवगड येथे पर्यटक समुद्रात बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु गुहागर कोठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटक आता गुहागर तालुक्याला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे या हंगामातील सुरक्षेबाबत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गुहागरचा समुद्रकिनारा, मोडकाआगर येतील नौका विहार आदी स्थळांना भेटी दिल्या. पर्यटन व्यावसायिकांना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कोणीही तडजोड चालणार नाही. अशा सूचनाही केल्या. त्यांच्या सुचनेनुसार आम्ही नोटीसी पाठवल्या. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर खोल समुद्रात जावू नये अशा सूचनांचे फलक लावले. मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पर्यटकांना कोणताही अपघात होऊ नये यासाठी पोलीस, मेरी टाईम बोर्ड व गुहागर नगरपंचायतीचे सुरक्षा रक्षक पर्यटकांना सूचना देतात. पर्यटनासाठी आलेल्या महिलांशी अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन दक्ष असते. सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनारी मद्यपान करुन कोणीही चुकीचे वर्तन करणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेत असते. पर्यटन व्यावसायिकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सावध करण्यात येते. Crowd of tourists at Guhagar Beach