मुंबई, ता. 29 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतिशील, ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ असा असून सर्व समाजघटकांना दिलासा देणारा, त्यांचा विचार करणारा आहे. हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. Budget of Maharashtra
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाचा विचार पुढे नेणारा आहे. मी अजितदादा पवार यांचे अभिनंदन करतो. महिला, युवा आणि शेतकऱ्यांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. सातत्यपूर्ण विकासाचा यात निर्धार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह 1500 रुपये देण्यात येणार असून यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Budget of Maharashtra
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या माध्यमातून 45 लाख शेतकऱ्यांना वीजमाफी दिली जाणार आहे. यासाठी 7777 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. सौर ऊर्जा योजना याच्या अंमलबजावणीचा विचार सुद्धा केला आहे. 18 महिन्यात ही योजना पूर्ण करायची आहे, त्यामुळे 30% अनुदान मिळणार आहे. सर्व कृषिफिडर सौर उर्जेवर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकणार आहोत. 9.5 लाख सौरऊर्जा पंप मंजूर केले आहेत. यापुढेही जो अर्ज करेल, त्याला ते मंजूर केले जाणार आहेत. यामुळे 90% शेतकरी हे मोफत विजेचे लाभार्थी होणार आहेत. सोबतच उपसा सिंचन योजनेचे सौर उर्जिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि 1 रुपयात पीकविमा यासारख्या योजना सुरूच राहणार आहेत. दुधाला 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Budget of Maharashtra
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. या हवेतील घोषणा नाहीत, तर विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहेत. हा थापांचा नाही, तर माय-बापांचा अर्थसंकल्प आहे. कोरोना, दुष्काळी वर्षात दरडोई उत्पन्नात कमी-अधिक होणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही प्रगत राज्याच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. आर्थिक बेशिस्तीकडे राज्य जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Budget of Maharashtra