गुहागर, ता. 25 : भारतीय शेतीक्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, या उद्देशाने अॅग्रिस्टॅक (Agristack) या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रिकल्चर योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे डिजिटल सक्षमीकरण होऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने मिळणार आहे. गुहागर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गास विनंती करण्यात येते की, त्यांनी आधार कार्ड व आधार संलग्न मोबाईल सोबत घेऊन जवळच्या नागरी सुविधा केंद्रावर (CSC) भेट देऊन नोंदणी करावी. असे तहसिलदार गुहागर यांनी आवाहन केले आहे. Agristack Scheme
फार्मर आयडी – एक विशेष ओळखपत्र
अॅग्रिस्टॅक योजनेचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे ‘फार्मर आयडी’ ही संकल्पना आहे. प्रत्येक शेतकरी खातेदाराला एक विशिष्ट फार्मर आयडी दिला जाणार आहे. हा आयडी म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल जगातील एक विशेष ओळखपत्र ठरणार आहे. फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ सहज आणि जलद गतीने मिळणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात आर्थिक मदत मिळणे सुलभ होणार आहे.
पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पीक विम्याचा लाभ सहज उपलब्ध होणार आहे.
पीक कर्ज योजनेअंतर्गत शेतीसाठी आवश्यक असणारे पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
नुकसान भरपाई अनुदानाअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
हवामान माहितीचा अचूक हवामान अंदाज आणि संबंधित माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे.
मृदा आरोग्य योजनेअंतर्गत जमिनीच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि सल्ला मिळणार आहे.
किमान आधारभूत किमतीवर खरेदीसाठी नोंदणी सुलभ होईल.
सरकारी योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल. योजनेसाठी लाभार्थीची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता भासणार नाही.
बाजारपेठेपर्यंत सोयीस्कर प्रवेश मिळेल.
पीक सल्ला योजनेअंतर्गत विविध पिकांबाबत तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. Agristack Scheme
नोंदणी प्रक्रिया
फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ १. आधार कार्ड २. आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक या दोनच गोष्टींची आवश्यकता आहे . नोंदणीसाठी गावपातळीवर तलाठी कार्यालय, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, CSC केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना डिजिटल क्रांतीचा भागीदार बनवून त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे डिजिटल सक्षमीकरण करावे, असे आवाहन केंद्रशासनाकडून करण्यात आले आहे. Agristack Scheme