पाटपन्हाळे-चिखली दरम्यान रात्रीचे अपघात
गुहागर, ता. 13 : गुहागर-विजापूर महामार्गावरील रस्ता रुंदीकरण झालेल्या गिमवी ते पाटपन्हाळे दरम्यान, काही ठिकाणी काँक्रीट उखडले आहे. याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा सुरु झाले असून या ठिकाणी रात्रीचे अपघात होत आहेत. सूचना दर्शविणारे फलक व्यवस्थितरित्या नसल्याने व अचानक वाहनचालक, प्रवाशांना न दिसल्याने येथे पडण्याचे प्रकार सुरु आहेत. ही दुरुस्ती प्रवासी, वाहनचालक यांच्या जीवावर बेतली असून निकृष्ट बांधकामाचे अजब नुमने आता समोर येत आहेत. Accident during Patpanhale-Chikhali
गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या निकृष्ट कामाचे अजब नमुने पुढे येत आहेत. अगोदरच वादात सापडलेला हा मार्ग निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एक वर्षातच या महामार्गवरील शृंगारतळी दरम्यान, रस्त्याचे काँक्रीट उखडले असून त्याच्या दुरुस्तीला पुन्हा सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या काँक्रीटला तडे जाणे, निकृष्ट गटारांचे काम, पुलांचे कठडे, भिंती यांची कामे व्यवस्थित झालेलीच नाहीत. तडे गेलेल्या काँक्रीटला सिमेंटचा मुलामा लावून किंवा त्यामध्ये डांबर भरण्याचे प्रकार मध्यंतरी सुरु होते. आता रस्त्याचे काँक्रीटच उखडल्याने तेवढा भाग खणून काढून पुन्हा एकदा तो भाग काँक्रीटचा करण्यात येत आहे. अवघ्या एक वर्षातच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. Accident during Patpanhale-Chikhali
ज्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु आहे तेथे खोदाई करुन काँक्रीटचा भराव तेथेच डेपो करुन ठेवला जात आहे. तेथे एकेरी मार्ग करुन त्याच्या बाजूने केवळ दगड लावून ठेवण्यात आले आहेत. महामार्गावर नेहमीसारखीच भरधाव वाहने असल्याने रात्रीच्यावेळी वाहनचालकांना येथील सुरु असणारे काम लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी वाहनांचे अपघात घडत आहेत. अशा तीन घटना या मार्गावर घडल्या आहेत. वेळंब फाटा येथे पेव्हरब्लाँकच्या कामासाठी खोदाई केलेल्या ठिकाणी रिक्षा पलटी झाली. पाटपन्हाळे दरम्यान, सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी एका दुचाकीस्वार पडून जखमी झाला. तसेच चिखली येथेही असाच अपघात झाला आहे. एकूणच या अपघातांमुळे महामार्गाविरोधात वाहनचालक, प्रवासी यांच्यामध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. Accident during Patpanhale-Chikhali