तटकरें लढाईत आजी माजी आमदार सेनापतीच्या भुमिकेत
गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांची जबाबदारी एक आमदार, एक माजी आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यांच्या मदतीला दोन नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नि:शंक मनाने प्रचारला सुरवात केल्याने महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे निर्धास्त झाले आहेत. Inclusion of all parties in the campaign
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली मंडणगड आणि गुहागर असे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा क्षेत्राला जोडलेले आहेत. गुहागर विधानसभा क्षेत्रात चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र तर खेड तालुक्यातील 90 मतदान केंद्र येतात. या विधानसभा क्षेत्रातील प्रचाराची जबाबदारी माजी आमदार आणि भाजपचे गुहागर विधानसभा प्रमुख डॉ. विनय नातू यांनी स्वीकारली आहे. लोकसभेच्या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पहा. प्रत्येक बुथवर महायुतीला विजयी करा. हा संदेश भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आणि मेंदुत ठसविण्यात डॉ. नातू यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मोदींसाठी घड्याळाला मत ह्या विचाराने भाजप कार्यकर्ते प्रचार करु लागले आहेत. लोकसभा जाहीर होण्याआधी संघटनात्मक रचना भाजपने पूर्ण केली. पक्षाचा आणि नंतर महायुतीचा मेळावा घेवून कार्यकर्त्यांना क्रियान्वित केले. त्यामुळे आता प्रत्येक कार्यकर्त्याचा पाठपुरावा, त्या कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या माहितीवर काम या पध्दतीने प्रचारही सुरु झाला आहे. या विधानसभा क्षेत्रातील वहाळ, मुर्तवडे, कापसाळ, कामथे, वीर, कोकरे, नायशी या परिसरात शिंदे सेनेचे शरद शिगवण आणि चिपळूण संगमेश्र्वरचे आमदार शेखर निकम यांचाही संपर्क आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून प्रचाराचे नियोजन होणार आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लक्ष घातले आहे. Inclusion of all parties in the campaign
खेड, दापोली, मंडणगड विधानसभा क्षेत्रात आमदार योगेश कदम यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना सक्रीय केले आहे. ते ही या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पहात आहेत. त्याच्या जोडीला स्वाभाविकपणे रामदास कदम आहेतच. या मतदारसंघात भाजपने देखील आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पक्षाचे बळ वाढले आहे. त्यांच्यासोबत अब की बार 400 पार साठी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे मेहनत घेत आहेत. Inclusion of all parties in the campaign
खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही मतदारसंघातील कुणबी समाजातील मातब्बर पदाधिकाऱ्यांना मागील टर्ममध्ये राष्ट्रवादीत घेतले होते. त्यांच्यावर कुणबी समाजातील बैठकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात या समाजात जाणिवपुर्वक केलेले काम आणि वाढविलेला संपर्क याचा फायदा उचलण्यासाठी स्वतंत्र रणनिती तटकरे यांनी आखली आहे. Inclusion of all parties in the campaign
लोकसभेची उमेदवारी घोषित होण्यापूर्वी भाजपमध्ये स्वपक्षाचा उमेदवार हवा म्हणून जोरदार तयारी सुरु होती. शेकापमधुन भाजपमध्ये आलेले माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी संपूर्ण मतदार संघात बैठका घेतल्या होत्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रदेश भाजपने येथील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनपूर्वक बैठका घेतल्या. उत्तर रत्नागिरीमध्ये ही जबाबदारी पक्षाचे पालक रवींद्र चव्हाण यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी 3 ते 4 ठिकाणी शिवसेनेचे जाहीर मेळावे घेतले. त्यामध्ये सुनील तटकरे उपस्थित होते. आचारसंहिता लागल्यावर पुन्हा एकदा दोन्ही मतदारसंघात महायुतीचे मेळावे झाले. भाजपने स्वतंत्ररित्याही मेळावे घेतले. या सर्वांचा परिणाम म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वांनी एकत्रीत काम करण्याचा विचार पक्का झाला. आता कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या कार्यपध्दतीप्रमाणे प्रचार कार्यात गुंतले आहेत. त्यामुळे सध्यातरी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रचारात महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. Inclusion of all parties in the campaign
मधु चव्हाणही तळ ठोकून
भाजपचे माजी आमदार, पक्ष प्रवक्ते म्हणून काम पाहिलेले माजी आमदार मधुकर चव्हाण यांचे गाव मार्गताम्हाने असल्याने भाजपने त्यांच्यावर गुहागर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. विधानसभा क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी, प्रचारावर लक्ष ठेवणे आणि कार्यकर्त्यांना उत्साहपुर्ण मार्गदर्शन करणे आदी जबाबदाऱ्या प्रदेश भाजपने त्यांच्यावर सोपविल्या आहेत. Inclusion of all parties in the campaign