मुंबई, ता. 18 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. BJP nominated Narayan Rane
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून तिढा होता. या जागेसाठी शिंदे गट आग्रही होता. या जागेसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक होते. मात्र, आज उदय सामंत यांनी भाजपकडून नारायण राणेंना उमदेवारी जाहीर झाल्यास काम करू, असे स्पष्ट केले. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या जागेवरील दावा सोडला. त्यानंतर दुसरीकडे भाजपने १३ वी यादी समोर आली. या यादीत भाजपकडून नारायण राणे यांना रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. BJP nominated Narayan Rane
भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी झाल्यानंतर या मतदारसंघात लढत स्पष्ट झाली आहे. या मतदारसंघात आता नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. नारायण राणे म्हणाले, ‘आताच मी टीव्हीवर पाहतोय की, माझी उमेदवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी झाली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे. मी त्यांचा आभारी आहे. मी उद्या ११ वाजता माझा अर्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भरणार आहे. तत्पूर्वी ‘उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा द्यायचा ठरवलं, मी त्यांचे स्वागत करतो. तसेच त्यांना धन्यवाद देतो, असे त्यांनी स्पष्ट केले. BJP nominated Narayan Rane