गुहागर, ता. 08 : महाशिवरात्रीनिमित्त गुहागरमध्ये 9 ते 11 मार्च या कालावधीत व्याडेश्र्वर महोत्सव रंगणार आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि संकासुर खेळे असे कार्यक्रम होणार आहेत. मानवी शिल्प कला, शासकीय योजनांची माहिती देणारा स्टॉल महोत्सवात असणार आहे. तसेच महोत्सव पहायला येणाऱ्या 5 जणांना देवस्थानतर्फे बक्षिसे देण्यात येणार आहेत. Vyadeshwar Festival
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान
गुहागरमधील व्याडेश्र्वर देवस्थानने गेल्या काही वर्षात महाशिवरात्रीनिमित्त व्याडेश्र्वर महोत्सव हा आगळावेगळा कार्यक्रम दृढ केला आहे. या महोत्सवामुळे कोकणातील खाद्य व लोककला संस्कृती तालुकावासीयांसह अनेक पर्यटकांना अनुभवता येते. ९ मार्चला सायंकाळी 6 वाजता व्याडेश्र्वर महोत्सवाचे उद्घाटन गुहागरमध्ये नव्याने रुजू झालेले तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात उपक्रमशील शिक्षक अमोल धुमाळ, इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या सोहम बावधनकर, त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ. नेहा जोगळेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. Vyadeshwar Festival
जादुचे प्रयोग मुलांसाठी आकर्षण
पहिल्या दिवसाची सुरवात नृत्यसाधना कथ्थक अकादमीच्या गणेश वंदना या कथ्थक नृत्याने होईल. जादुगार अवधुत यांचे जादुचे प्रयोग आणि मिमिक्री, इंद्रधनु कला संस्थेचे मंगळागौर, कोळीगीत, गोंधळ अशी संस्कृतीचे दर्शन घडविणारी समुह नृत्ये सादर केली जाणार आहेत. शृंगारतळी येथील रिगल कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाची आगळी वेगळी वारकरी दिंडी यावेळी उपस्थितांना पहायला मिळेल. पहिल्या दिवसाची सांगता वरचापाट घोरपडे विभागाच्या संकासुर व खेळ्याने होईल.


पालखी नृत्याची झलक अनुभवा
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात सदाबहार व्हायोलीन पुणे या संस्थेच्या कलाकारांच्या व्हायोलनीन वादनाने होइल. नाट्यसंगीत, भक्तीगीतांबरोबरच हे कलाकार व्हायोलीनची जुगलबंदीही सादर करणार आहेत. शिमगोत्सवानंतर कोकणातील गावागावात रंगतो तो पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याची झलक मळणवासीयांच्या पालखी नृत्य व आखाडा कार्यक्रमातून पहायला मिळेल. जिल्हातील विविध स्पर्धेत हमखास बक्षिसे मिळवणारी संस्था म्हणून ख्याती असलेल्या खिलाडी डान्स क्रियशन्स, असगोली या संस्थेची समुह नृत्य महोत्सवात पहायला मिळतील. दुसऱ्या दिवसाची सांगता वेळंब नमन मंडळींच्या संकासुर व खेळ्यांनी होईल.
65 खेळांची मंगळागौर पहायलाच हवी
महोत्सवाच्या अखेरच्या तिसऱ्या दिवशी संस्कृती ग्रुप चिपळूणतर्फे मंगळागौरीच्या दिवशी खेळले जाणारे 65 महिलांचे खेळ पहायला मिळणार आहेत. कलारंजनी डोंबिवली या संस्थेचा नृत्य आविष्कार, देवरुखच्या कला आविष्कार संस्थेचा ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमांनंतर वरवेली राजांणेवाडीच्या संकासुराचा नाच आणि ढोलकीचा नाद अनुभवता येणार आहे. दररोज 5 प्रेक्षकांना मिळणार भेटवस्तू याशिवाय महोत्सवाला येणाऱ्या प्रेक्षकांमधुन 5 लकी विनर शोधण्यात येणार आहेत. दररोज महोत्सवाच्या सुरुवातीच्या तासाभरात महोत्सव ठिकाणी एका बॉक्समध्ये कुपन संकलीत केली जाणार आहेत. या कुपनांमधील 5 जणांना निवडून त्यांना उत्तम भेट देवस्थानतर्फे देण्यात येणार आहेत.