कुडली माटलवाडी शाळा, विविध स्पर्धांचे आयोजन
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी येथे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या समवेत गावातून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी घोषणा व विविध गाण्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शाळा स्तरावर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आल्या. Voting Awareness Programme
यामध्ये बाहेरगावी असणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांनी पत्र लिहून मतदानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच मतदान जनजागृती साठी वेळोवेळी फलक लेखन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सभा व पालक सभा घेऊन ग्रामस्थांना शंभर टक्के मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख श्री. परवेज चिपळूणकर यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन व सहकार्य केले. माजी शिक्षक गणेश वायचाळ यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड,पदवीधर शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड व स्वयंसेवक सौरभ कटनाक यांनी पंचायत समिती गुहागर शिक्षण विभागाच्या माध्यमातून दिलेल्या सूचनानुसार सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडले. यावेळी ग्रामसेवक हरीश कुळये यांनीही उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. स्वीप अंतर्गत दिलेले सर्व उपक्रम यशस्वी केल्याबद्दल केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांनी सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले. Voting Awareness Programme