ठेकेदार पूर्वसूचना न देता काम करत असल्याने वादाचे प्रसंग
गुहागर, ता. 12 : सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे काम वेगाने सुरु आहे. ठेकेदार स्थानिक प्रशासनाला, ग्रामस्थांना विश्र्वासात न घेता काम करत असल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील कंत्राटी काम असल्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नियमबाह्य पध्दतीने होणाऱ्या या कामावर नक्की अंकुश कोणाचा आहे का असा प्रश्र्न सध्या तालुकावासीयांकडून उपस्थित केला जात आहे. Villagers troubled by underground channel work


रस्त्याच्या कडेने खोदाई करुन भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरक्षेचे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत. तालुक्यातील असगोली गावातील तीव्र उताराच्या अरुंद रस्त्यावर खोदाई केलेली माती टाकल्याने दुचाकीस्वार घसरुन पडले. गुहागर शहरात रस्त्याच्या बाजुला खोदलेल्या खड्ड्यात पडून असगोलकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. आजही हा तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. गुहागर शहरातील खालचापाट परिसरात खोदाईचे काम करताना जलवाहिनी फुटली. पालशेतमध्ये गटारातच खोदाई सुरु होती. हे थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना ठेकेदार कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांने शिवीगाळ केली. महावितरणची भूमिगत वाहिनी जमीनीपासून 4 फूट खोल टाकायची असताना अनेक ठिकाणी 2-3 फुटावर टाकण्यात आली आहे. कोणत्याही पुलावरुन, मोऱ्यावरुन वाहिन्या नेताना केबल पॅरापेट किंवा रेलिंगच्या बाहेरील बाजूने लोखंडी क्लँपच्या साह्याने टाकण्याचे शासकीय निर्देश आहेत. मात्र हे ठेकेदार पुलावरुन वाहिन्या टाकून त्यावर काँक्रीटीकरण करत आहेत. Villagers troubled by underground channel work


या सगळ्या कामांबाबत ठेकेदाराकडे ग्रामस्थाने विचारणा केली की ठेकेदार अरेरावीच्या भाषेत उत्तरे देतात. आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आहोत आमचे कोणी वाकडे करु शकत नाही. असे सांगितले जाते. या मुजोरीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. विकास कामांना आमचा विरोध नाही मात्र स्थानिक जनतेला विश्र्वासात घेवून, तेथील समस्या जाणून काम करावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. परंतू स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनापासून, पंचायत समिती, महसुल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे अधिकारी मात्र या कामाकडे दुर्लक्ष करतात की काय अशीच सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने होणाऱ्या कामाला जबाबदार कोण असा प्रश्र्न सध्या तालुकावासीयांना पडला आहे. Villagers troubled by underground channel work


केबलने आमच्या गावातील सतेश घाणेकर याचा वर्षभरापूर्वी बळी गेला. सुचित असगोलकर मेंदुला मार लागल्याने रुग्णालयात आहे. भूमिगत वाहिन्यांच्या कामावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. – राहुल कनगुटकर, असगोली
पालशेत गावात गटाराचे काम मंजूर झाल्याने येथे चेंबर बांधु नका असे सांगायला गेल्यावर झालेल्या वादात ठेकेदार कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी मलाच शिबीगाळ केली. हे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यासमोर घडले तरीही त्यांनी चकार शब्द काढला नाही. – विजय नागवेकर, पालशेत Villagers troubled by underground channel work