राष्ट्रीय समाज पक्षासह एका अपक्षाचाही समावेश
गुहागर, ता. 29 : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार पुत्र विक्रांत जाधव यांनीही गुहागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रमोद आंब्रे (लोटेमाळ, खेड) आणि अपक्ष म्हणून संदिप फडकले (असगणी, ता. खेड) यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे काल भरल्या गेलेल्या उमेदवारांची संख्या ५ वर पोचली आहे. Vikrant Jadhav nomination form has been filed
काल सोमवारी राजेश बेंडल आणि प्रमोद गांधी यांच्या आधी विक्रांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विक्रांत जाधव यांच्या उमेदवारीमुळे गुहागरमधून नक्की कोण लढणार, आमदार भास्कर जाधव आयत्यावेळी माघार घेणार की चिपळूणातूनही अर्ज भरणार. गुहागरची निवडणूक सोपी झाल्याने विक्रांत जाधव यांना आमदारकीची संधी मिळणार अशा चर्चांना आज उधाण आले आहे. विक्रांत जाधव यांचे नाव गुहागरमधुन उमेदवारीसाठी आधीपासुनच चर्चेत होते. मात्र 24 तारखेला शक्तीप्रदर्शन करीत आमदार भास्कर जाधव यांनी अर्ज भरल्याने या नावाची चर्चाच थांबली होती. काल अचानक विक्रांत जाधव आपल्या सहकाऱ्यांसह गुहागरमध्ये येऊन अर्ज भरुन गेले. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. राजेश बेंडल यांना महायुतीने उमेदवारी दिल्याने ही निवडणूक जड जाईल असे वाटत असल्याने आमदार भास्कर जाधव यांनी विक्रांत जाधव यांना उमेदवारी दिली. अशीही चर्चा सुरु झाली आहे. Vikrant Jadhav nomination form has been filed