उदय सामंत, राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज भरला
गुहागर, ता. 29 : शामराव पेजे, तु.बा.कदम, शिवाजीराव गोताड, ल.र. हातणकर, रामभाऊ बेंडल या कुणबी समाजाच्या आमदारांनी कोकणचे नेतृत्त्व केले होते. मात्र मधल्या कालावधीत समाजातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. यावेळी पुन्हा एकदा महायुतीच्या पुढाकाराने कुणबी समाजातील सर्व जातीधर्माचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागरमध्ये केले. महायुतीतर्फे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यापूर्वी झालेल्या सभेत सामंत बोलत होते. Rajesh Bendal filed the nomination form


शिवसेनेतर्फे महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश बेंडल यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे कार्यकर्ते, बळीराज सेना, आरपीआय, कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, पंचायत राज जिल्हा संयोजक यशवंत बाईत असे काही निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी चौकातून शक्तीप्रदर्शन करीत महायुतीची मिरवणुक एस. टी. स्टॅण्ड समोर आली. तेथे मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले. या सभेत बोलताना राजेश बेंडल म्हणाले की, टिका करणे हा माझा पिंड नाही. मात्र दुपारी 12 वाजता उठण्याची सवय असती तर पंचायत समितीचा उपसभापती, सभापती आणि गुहागरचा नगराध्यक्ष झालो नसतो. सर्व समाजाचा सर्वांगिण विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवूनच माझी राजकीय वाटचाल पूर्वीपासून सुरु आहे. आजही हीच भुमिका घेवून मी निवडणुकीला सामोरा जात आहे. मतदारसंघाला आरोग्य, कृषी, क्रीडा, आर्थिक, आदी सर्व क्षेत्रात विकसीत करणे. सर्व जातीधर्माच्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील रहाणार आहे. Rajesh Bendal filed the nomination form


पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने महाराष्ट्राचा विकास केला. घर सांभाळणाऱ्या आयाबहीणींना लाडकी बहीण योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पाऊल उचलले. आज पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी देवून जिल्ह्यातील कुणबी समाजाचा सन्मान केला आहे. आम्ही टिका करत नाही म्हणून आम्हाला हतबल समजू नये. आजवर मी तीन हल्ले पचविले आहेत. हे हल्ले विरोधकांनीच केले होते. तरीही टिका करण्यापेक्षा विरोधकांना कामाने उत्तर देण्याचे काम करत आहोत. Rajesh Bendal filed the nomination form
यावेळी राजेश बेंडल यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अनिल जोशी, तालुकाध्यक्ष सुरेश सांवत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहील आरेकर, आरपीआय (आठवले गट) तालुकाध्यक्ष संदिप कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत शिंदे, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, बळीराज सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश भायजे, संपर्क प्रमुख शरद बोबले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. Rajesh Bendal filed the nomination form


डॉ. विनय नातू, रामदास कदम अनुपस्थित काल महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातु, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे उपस्थित नव्हते. त्यामुळे या नेत्यांची भुमिका काय रहाणार याबाबतची चर्चा सुरु होती. पालकमंत्री उदय सामंत सातत्याने या दोन्ही नेत्यांचा राजेश बेंडल यांना पाठींबा आहे. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत असे सांगून वेळ मारुन नेत होते. Rajesh Bendal filed the nomination form