सत्यवान देर्देकर यांचा उपक्रम, खाडी पर्यटनाला मिळणार चालना
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 15 : मध्यप्रदेश राज्यात माँ नर्मदाला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवली जाते. ठिकठिकाणी यावेळी नर्मदेच्या तीरावर विविध धार्मिक, सांस्कृतीक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. असाच पहिला प्रयोग यंदा गुहागर तालुक्यातील परचुरी येथे केला जाणार आहे. 22 मार्चला विधीवत वाशिष्ठी नदीला साडी नेसविण्यात येणार आहे. ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी परचुरीतील सत्यवान देर्देकर हा तरुण पर्यटन व्यावसायिक झपाटून कामाला लागला आहे. Vashishti Tourism Festival
22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेवून 22 मार्चला वाशिष्ठी नदीचे पूजन आणि तिला साडी नेसवण्याचा कार्यक्रम परचुरीमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या जोडीला 18 ते 22 मार्च पाच दिवस वाशिष्ठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवामध्ये सत्यवान देर्देकर यांच्या हाऊसबोटवर दररोज सकाळी 9 ते 12 व संध्याकाळी 3 ते 6 या मराठीतील भागवत पुराण व मत्स्य पुराण वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे खाडी सफर, मगर दर्शन सफर असे कार्यक्रम खाडीपात्रात पर्यटकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 50 पर्यटकांना खाडी सफरीतून मगर दर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. ज्या पर्यटकांना पुराण कथा ऐकायच्या आहेत त्यांना हाऊसबोटवरील कथा वाचन कार्यक्रमातही सहभागी होता येणार आहे. Vashishti Tourism Festival
या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना ही परचुरीमध्ये आजोळ कृषी पर्यटन केंद्र सुरु करणाऱ्या सत्यवान देर्देकर यांची आहे. संकल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी कोकणातील निसर्ग, पर्यटन यांचे अभ्यासक धीरज वाटेकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि वाशिष्ठी महोत्सवाला अधिक झळाळी देण्याचे काम केले आहे. या महोत्सवाचे समन्वयक म्हणून यादवराव यांच्या ग्लोबल कोकण आणि कोकण भूमि प्रतिष्ठान या दोन संस्था काम करत आहेत. Vashishti Tourism Festival
या आगळ्या वेगळ्या आणि कोकणात प्रथमच होणाऱ्या वाशिष्ठी महोत्सवामध्ये दापोली, चिपळूण, खेड आणि गुहागरमधील पर्यटन व्यावसायिकांनी सहभागी व्हावे. त्याच्याकडे वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांपर्यंत या महोत्सवाची माहिती पोचवावी. 18 ते 22 मार्च दरम्यान त्यांनी पर्यटकांना या महोत्सवात सहभागी होण्यास सांगावे. तसेच वाशिष्ठी खाडीमध्ये जल पर्यटनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनीही या महोत्सवात सहभागी व्हावे. त्यांच्या माध्यमातून पर्यटकांना खाडीमार्गे परचुरीपर्यंत आणावे. असे आवाहन या निमित्ताने सत्यवान देर्देकर यांनी केले आहे. Vashishti Tourism Festival
निसर्ग आणि पर्यावरणबाबत सजग करणारा उपक्रम
यापूर्वी वाशिष्ठी – उगम ते संगम असा साहसी पर्यटनाला धरुन असलेला उपक्रम झाला होता. त्यानिमित्ताने जादुई प्रदेश पहाण्याची, निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी सर्वांना मिळाली. आता याच नदीचे पूजन आणि तिला साडी नेसवण्याचा अभिनव उपक्रम होतोय हे कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमधुन निसर्ग आणि पर्यावरणबाबत सजगता निर्माण करतो. त्यामुळे खाडी किनारी असलेल्या तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांनी असे उपक्रम यशस्वी केले पाहिजेत. – धीरज वाटेकर, चिपळूण Vashishti Tourism Festival