गणेश किर्वे, वरवेली
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र.१ हे गेली अनेक वर्षे कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जपत आहे. या मंडळींनी नमन खेळ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून श्री दत्तमंदिर, राजहंस सभागृह, नळपाणी योजना असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोकणातील प्रसिध्द असलेला वरवेलीचा शंकासूर पर्यटकांचेही आकर्षण ठरत असून संकासुरनृत्य चाकरमान्यांना भुरळ पाडत आहे. या नमन मंडळाने शेकडो वर्षांची परंपरा अजूनही जोपासली आहे. Varveli Ranjanewadi Naman
हे राजहंस नमन मंडळाचे खेळी दुसऱ्या होळीच्या दिवशी श्रीहसलाईदेवी मंदिरात नमन करुन तिचा आशिर्वाद घेऊन ही मंडळी भोवनीसाठी बाहेर पडतात. या कालावधीतच उन्हाचा तडाखा वाढत असताना देखील प्रथा, परंपरा जपण्यासाठी ही मंडळी अनवाणी पायाने फिरत असतात. आपल्या ग्रामदेवतेचे चिंतन हेच या प्रथा जपण्यास आपल्याला बळ देते असे ग्रामस्थ सांगतात. गेली अनेक वर्षे गाव भोवनीसाठी नमन खेळे विविध गावात जात असतात. यातील बहुतांश नमन मंडळी ही मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र शिमगोत्सवात गावाकडे परतुन भोवतीच्या नमनखेळ्यात सहभागी होतात. जागरणकरुन मुंबईत सराव करायचा आणि शिमगोत्सवात भोवनीचे खेळे फिरण्यासाठी गावी यायचे, नमनाचे कार्यक्रम करायचे शिमगोत्सव संपल्यानंतर पुन्हा रोजीरोटीसाठी मुंबईत जायचे. Varveli Ranjanewadi Naman
वरवेली येथील निसर्गसंपन्न डोंगराच्या कुशीत वसलेल्या साधारणतः चारशे लोकवस्तीची रांजाणेवाडी आहे. गावाच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक परंपरा उराशी बाळगुन ही वाडी स्वतःच्या प्रथा, परंपरा, पिढ्यांपिढ्या जपत आली आहे. मुंबई कुंभारवाड्याच्या गोल देऊळाच्या तिसऱ्या गल्लीत वाडीतील चाकरमानी बहुतांश राहत होते. साधारणतः १९७० साली भजनप्रेमी के. बाळाराम महादेव रांजाणे यांच्या पहाडी आवाजाने भजनामध्ये मुंबईसह पंचक्रोशी गाजवली. त्याठिकाणी भजन करतानाच या भजन मंडळाच्या नावावर चर्चा व्हायच्या. राजहंस म्हणचे रांजाणेवाडीतील ‘राज’ आणि ग्रामदेवता हसलाईदेवीतील ‘हंस’ यापासून राजहंस या राजेशाही नावाने ओळख झाली. Varveli Ranjanewadi Naman
राजहंस नमन सादर करताना गण म्हणजे गणेशवंदना यानंतर गौळण, गौळणींना मथुरा बाजाराकडे जाताना अडवणाऱ्या पेंद्या, सुदाम आणि वाकड्या यांची जुगलबंदी व त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा प्रवेश अशा विविध रुपे धारण करून ही गवळण आधुनिक गीताच्या चाली व संगीत श्रवणीय असते. मृदूंगाची थाप कानी पडली की मन बैचेन होते. यानंतर सुरु होतो तो विनोदी विडंबनात्मक काल्पनिक फार्स यामध्ये सामाजिक, राजकीय अशा स्वरुपाचे फार्स मंडळ सादर करतात. मध्यतंरानंतर ऐतिहासिक, काल्पनिक, पौराणिक वगनाट्य रंगते. Varveli Ranjanewadi Naman