निवडणुकीनंतर दोन दिवस निवांतपणा
गुहागर, ता. 22 : राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींना उसंतीचे दोन दिवस मिळतात ते केवळ मतदान झाल्यावर मतमोजणी होईपर्यंत. या दोन दिवसांत मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी अंतर्मुख झाले आहेत. महायुतीचे राजेश बेंडल यांच्या घरी कार्यकर्त्यांचा राबता होता. तर आमदार भास्कर जाधव कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच घरी आलेल्या नातेवाईकांसोबत दोन दिवस होते. Two days after elections
निवडणुकीच्या धामधुमीनंतर मतमोजणीसाठी दोन दिवस शिल्लक असताना गुहागर विधानसभेतील उमेदवारांची दिनचर्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांशी संवाद साधला. त्यावेळी आमदार जाधव म्हणाले की, आजपर्यंत ९ निवडणुका लढविल्यामुळे निकालाची फारशी चिंता करत नाही. मतदानानंतर कार्यकर्त्यांसोबत तपशीलात संवाद साधुन आम्ही उद्या काय निकाल लागेल हे आधीच जाणून घेतो. यावेळी दोन दिवस कार्यालयात बसून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी केल्या. त्याचबरोबर सध्या घरात भाऊ, त्यांच्या मुली, जावई, सुना, मुले अशी जवळपास 100 जण आहोत. त्यामुळे उर्वरित वेळ मी परिवारासोबत घालावला. यावेळी राजकारणाशिवाय एकमेकांच्या सुखदु:खाच्या गप्पा सुरु आहेत. Two days after elections
प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल म्हणाले की, यापुर्वी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु प्रत्यक्ष उमेदवार असल्याने निकालाबाबत उत्कंठा आहे. दिवसा अनेक मंडळी भेटायला येतात. मतदानापर्यंत आम्ही जे सांगत होतो ते कार्यकर्ते ऐकत होते. हे दोन दिवस आम्ही कार्यकर्ते काय सांगतात ते ऐकतो आहोत. वडीलांसोबत काम केलेली काही ज्येष्ठ मंडळी येवून भेटली. गप्पा मारताना भावूक झाली. त्यातून पुन्हा एकदा वडिलांचा मोठेपण समजला. Two days after elections
निवडणुकीचा कोणताही पूर्वानुभव नसलेले प्रमोद गांधी मात्र या निवडणुकीतील प्रचारानंतर अस्वस्थ आहेत. गांधी म्हणाले की, आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमी होती. तरीही अनेकांनी आपण उमेदवार असल्याप्रमाणेच काम केले. असे जीव देणारे कार्यकर्ते यानिमित्ताने भेटले. थेट जमीनीवर उतरुन काम केल्याचा आनंद मिळाला. परंतु मतदान संपल्यानंतर मतदारांच्या मानसिकतेने अंतर्मुख झालो आहे. अनेक वाड्या वस्त्यांवर विकास नको, समस्या नको आम्हाला काय देणार ते सांगा ही मानसिकता लक्षात आली. मतांची दलाली करणारे मध्यस्थ भेटले. हव्यासापोटी विचारधारा सोडण्यास तयार असलेले कार्यकर्तेही भेटले. हे सर्व कधीतरी संपले पाहीजे. समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहीजे. असे वाटु लागले आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. Two days after elections