गुहागर, ता. 06 : तालुक्यातील वडद येथे भरदिवसा एका महिलेचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या लहान मुलीला अंगणवाडीतून घरी घेऊन जात असताना रस्त्यात ही जबरी चोरी घडली. भरवस्तीत आणि भरदुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thief snatched a woman’s mangalsutra.
मिळालेल्या माहितीनुसार, वडद कुंभारवाडी येथील रहिवासी असलेल्या सृष्टी विनायक राऊत (वय २६ वर्षे) या बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपली मुलगी स्वरा हिला अंगणवाडीतून घेऊन घरी जाण्यासाठी पायी निघाल्या होत्या. वडद काजूवाडी ते वडद कुंभारवाडी जाणार्या रस्त्यावरील वडद शाळा क्रमांक दोनजवळ त्या आल्या असता, पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एक अनोळखी व्यक्ती आली. संबंधित व्यक्तीने अंगात हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता, तसेच ओळख पटू नये म्हणून डोक्यावर हेल्मेट आणि चेहर्यावर मास्क लावला होता. सृष्टी राऊत यांच्या जवळ दुचाकी आणून या भामट्याने काही समजण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोराने हिसकावले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरून आरडाओरड करेपर्यंत आरोपी दुचाकीवरून वडद काजूवाडीच्या दिशेने वेगाने पसार झाला. चोरीला गेलेले तीन पदरी सोन्याचे मंगळसूत्र सुमारे दोन तोळे तीन ग्रॅम वजनाचे असून त्याची अंदाजे किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. Thief snatched a woman’s mangalsutra.
या घटनेनंतर सृष्टी राऊत यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३०४(२) (भा.दं.वि. कलम ३९२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११६/२०२६ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरी झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, गुहागर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित मार्गांची पडताळणी करून आरोपीचा कसून शोध घेत आहेत. Thief snatched a woman’s mangalsutra.
