AK मराठे, कुर्धे, 9405751698
Guhagar News : पावसाळी पर्यटन करण्यासाठी सकाळी गुहागर, चिपळूण दौऱ्यावर बाहेर पडलो. अडुर गावी एक धबधबा असल्याचे कळले होते. मात्र चुकीच्या माहितीमुळे तो पाहता आला नाही. निराश मनाने निवोशी/सुसरोंडीच्या धबधब्याकडे जायला निघालो.वाटेत पालशेतला एका सदगृहस्थाने एकट्याने जाऊ नका. जंगलात आहे, वाट सापडणार नाही असा सल्ला दिल्याने आणखीच निराशा दाटून आली होती. पण धीर न सोडता निवोशी गावाच्या दिशेने निघालो. माझ्या सुदैवाने प्रसाद सावंत नावाचा एक तरूण, कॉलेजवयीन मुलगा मला धबधबा दाखवायला घेऊन गेला. Susrondi waterfall


पालशेत – निवोशी गावात असला तरी हा धबधबा सुसरोंडीचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. गुहागरपासून सुमारे 12/15 किमी अंतरावर असणारा हा धबधबा पाहण्यासाठी वाटेत दोन ठिकाणी प्रवाह ओलांडून जावं लागतं. सुदैवाने गेले 3/4 दिवस फारसा पाऊस नसल्याने सहजपणे धबधब्यावर जाता आलं. सुमारे 20/25 फुट उंचीचाच असला तरी हा धबधबा खूप छान आहे. Susrondi waterfall
या धबधब्याशेजारीच सुप्रसिद्ध सुसरोंडीची गुहा आहे. 2001 साली डेक्कन कॉलेजच्या प्रा.अशोक मराठे यांनी या ठिकाणी संशोधन आणि उत्खनन मोहीम राबविली होती. सुमारे 90000 वर्षांपूर्वीच्या मानवी अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारी काही अश्मयुगीन दगडी हत्यारे या गुहेत सापडली होती. कोकणातील गूढ कातळशिल्पांच्या अभ्यासात हा एक महत्वाचा दुवा/टप्पा मानला जातो. मात्र हौशी पर्यटकांच्या अतिरेकी उत्साहामुळे आता ही गुहा बंद करण्यात आली आहे. एकुणात दोन महत्वाची ठिकाणे पाहता आल्याने आजची भटकंती सत्कारणी लागली. Susrondi waterfall