घातपाताचा संशय; पोलीस तपास सुरू
रत्नागिरी, ता. 06 : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुरामनजीक असलेल्या सवतसडा धबधब्याजवळ एका तरूणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याने निर्माण झालेल्या खड्ड्यात हा मृतदेह अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे या तरूणीचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तर तरूणीचा अशाप्रकारे संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने चिपळूण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Suspicious dead bodies near Savatsada Falls
सध्या सवतसडा धबधब्याची पाणी पातळी पूर्णपणे घटली आहे. त्यामुळे सवतसडा धबधब्याच्या ठिकाणी कोणीही फिरकत नाही. अशातच सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परिसरातील चौपदरीकरणातील एक कामगार धबधब्यावर पाणी आणायला गेला होता. तेव्हा तेथे त्याला धबधब्याच्या पायथ्याला असलेल्या खडड्यात उलट्या अवस्थेत पडलेला तरूणीचा मृतदेह आढळून आला. तत्काळ त्याने ही माहिती पेढे येथील ग्रामस्थांना दिली. यानंतर येथील ग्रामस्थांनी पोलिस पाटील यांना माहिती देऊन तत्काळ चिपळूण पोलिसांना कळविण्यात आले. सायंकाळच्या सुमारास चिपळूण पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सवतसडा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी धबधबा ओसंडून वाहू लागल्यानंतर महामार्गावरून जाणारे तसेच परिसरातील अनेक पर्यटक या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यास येत असतात. Suspicious dead bodies near Savatsada Falls
याच धबधब्याच्या ठिकाणी हा तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने पेढे, परशुराम परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान उशिरापर्यंत या तरूणीची ओळख पटलेली नाही. या तरूणीच्या हाता-पायावर जखमा असून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. धबधब्याचे पाणी कोसळणाऱ्या खड्ड्यात या तरूणीला अक्षरश: कोंबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तरूणीचे पाय वरच्या स्थितीत असल्याने ती संबंधित कामगाराला दिसून आली. या प्रकरणी चिपळूण पोलिस तपास करीत आहेत. Suspicious dead bodies near Savatsada Falls