गुहागर, ता. 26 : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्याचा फटका घरे, गोठे आणि झाडांना बसला आहे. यामुळे मोठी नुकसानी झाली आहे. गुहागर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडूनही घडलेल्या नुकसानी किंवा आपत्तीनंतर त्वरित कार्यवाही केली जात असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. Storm Damage in Guhagar
गेली दोन दिवस तालुक्याला वादळी वारा आणि पावसाचा फटका मोठया प्रमाणात बसू लागला आहे. वरचापाट तर्फे गुहागर येथील श्रीम. अमिता आनंद खरे यांचे गोठ्याचे छत कोसळून त्यांचे सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. खोडदे येथील अभिजीत शिवराम साळवी यांचे घराचे सुमारे 25 हजार 500 रक्कमेचे, सुरळ येथील आनंदी धोंडू जड्याळ यांचा अतिवृष्टीने गोठयाचे 14 हजार 300 रुपयांचे, अनिता चंद्रकांत चव्हाण यांच्या गोठयाचे 4 हजाराचे नुकसान झाले आहे. आरे येथील श्रीम. माधुरी श्रीनिवास भोसले यांचे घराच्या पडवीचे छत कोसळून 15 हजाराचे, अडुर येथील दिपक प्रकाश जाधव याच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे अंदाजे 18 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले आहे. लिटल चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूल जानवळे येथे शाळेचा बांध कोसळून 16 हजार रुपयांचे, वेळंब वचनवाडी मधील निर्मला नारायण पोसरेकर यांच्या घराचे पत्रे उडून 3 हजाराचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही, वादळी वारे व पाऊस यामुळे वेळंब कातळवाडी मधील निर्मला राणे यांच्या घराचे पत्रे उडून २ हजाराचे, नम्रता नितीन गुरव यांच्या शौचालयाचे पत्रे उडून 2 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले. आरे मधील श्रीम. प्रमिला प्रकाश देवकर यांच्या घराचे पत्रे उडून 25 हजरचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. पालपेणे येथील चंद्रकांत बाळकृष्ण कातळकर यांचे गोठ्याचे अंशतः नुकसान झाले आहे. घाडेवाडी तर्फे वेळंब मधील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नं. २ शाळेच्या सभागृहाचे पत्रे व इमारतीच्या कौले उडून 9 हजार 500 रुपयांचे, नरवण येथील विजया दत्तात्रय नाटूस्कर यांचे गोठ्यावर झाड पडल्याने 7 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. Storm Damage in Guhagar
गुरुवारी सकाळी साखरी आगर शाळेच्या मागच्या बाजूला दरड कोसळल्याची घटना घडली. ग्रामपंचायत काताळे कार्यक्षेत्रातील तवसाळ, तवसाळ खुर्द, काताळे गावात गेले दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे हि गावे अंधारात असून त्यांचा सार्वजनिक नळ पाणी पुरवठा देखील बंद झाला आहे. तसेच पोमंडी गावातील वीज पुरवठा देखील गेले दोन दिवसांपासून खंडित आहे. निवोशी येथील योगिता एकनाथ दणदणे याच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. वसंत गोपाळ धूमक याच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून घराचे 14 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले आहे. मारुती मंदिर येथील प्रमोद रामा भायनक याच्या राहत्या घरावर नारळाचे झाड पडून 24 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले आहे. Storm Damage in Guhagar