मनसेच्या वतीने उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे निवेदन सादर
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलांची कामे वाळूबंदीमुळे बंद असून शासकीय बांधकामे सुद्धा बंद आहेत. यावर त्वरित कार्यवाही होणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्षाचे वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी कार्यकर्ते यांचे समवेत निवेदन गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांना नुकतेच दिले आहे. Statement to Tehsildar regarding sand ban


या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महसूल विभागातर्फे वाळू उत्खनन व वाळू विक्री बंद आहे. या वाळू बंदीमुळे मोदी आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलांचे बांधकाम होऊ शकत नाही. घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. त्यामुळे मोदी आवास योजनेतील गरीब, गरजू ग्रामस्थांना निवाऱ्यांपासून वंचित रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे शासकीय कामांचे बांधकामे देखील वाळू अभावी बंद आहेत. वाळूबंदी असल्याने काही ठेकेदारांकडून ग्रिटचा वापर केला जात आहे. त्यामुळे बांधकामे देखील दर्जेदार होऊ शकणार नाहीत. वाळूबंदी असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील देखील घरे व अन्य इमारतीचे बांधकामे होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पुढील फक्त तीन महिन्यांचा अवधी बांधकामे करण्यास मिळणार आहे. तीन महिन्यानंतर पावसाळा सुरू होतो, त्यामुळे लवकरात लवकर वाळूबंदी संदर्भात निर्णय घेण्यात यावा. वाळूबंदीमुळे स्थानिक रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तरी सदरचे निवेदन महसूल मंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचण्यास सहकार्य करावे ही विनंती. Statement to Tehsildar regarding sand ban


या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, चिपळूण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी, महोदय महसूल मंत्री यांना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून गुहागरची अनेक घरे मंजूर आहेत. मात्र घरांच्या बांधकामासाठी सध्या वाळू मिळत नाही तसेच जलजीवन मिशन योजनेचे पाणी योजनेच्या विहिरीवर साठवण टाक्याची कामे आणि शासकीय कामे प्रलंबित आहेत. या घरकुल घरांच्या बांधकामासाठी संबंधित लाभार्थ्यांना माफक दरात वाळू उपलब्ध होत नाही, वाळू उत्खनणास परवानगी नसल्याने १५ वा वित्त आयोग मधील विविध विकास कामे प्रलंबित आहेत. असे हि या निवेदनात म्हटले आहे. Statement to Tehsildar regarding sand ban