लोकगीते म्हणत दिड एकरवर अंकुर 101 ची लावणी
गुहागर, ता. 22 : मनुष्यबळाअभावी ओसाड पडणाऱ्या शेत जमीनीवर सामाजिक शेत करण्याचा उपक्रम साखरी बुद्रुक खुर्द गावातील ग्रामस्थांनी यशस्वी केला आहे. आज दिड एकर क्षेत्रात 80 ते 85 स्त्री पुरुषांनी एकत्र येत अंकुर 101 या भातरोपोंची लावणी केली आहे. यासाठी कुणबी एकता सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला. Social Farming Activities in Sakhri Khurd Village


कोकणातील अनेक शेतजमीनी आज ओसाड पडल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शेती करणे परवडत नाही. वन्य प्राण्यांचा उपद्रव होतो. अशी विविध वास्तववादी कारणे यामागे आहेत. शेतीऐवजी नोकरी केली तर अधिक पैसा मिळतो म्हणून येथील तरुण शहराकडे वळतो आहे. त्यामुळे गावागावांमधील घरात केवळ वार्धक्याकडे झुकणारी मंडळी पहायला मिळतात. शासनाकडून शेतीला प्रोत्साहन देण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. शेती किफायतशीर होण्याचे मार्ग सुचविले जातात. परंतु या प्रयत्नांना गती मिळत नाहीए. अशी प्रतिकुल परिस्थिती असताना साखरी बुद्रुक खुर्द मधील कुणबी एकता सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक शेतीचा विचार सर्वांसमोर ठेवला. संघटनेची मुंबई आणि गाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन या विचाराला अभियानाचे स्वरुप दिले. Social Farming Activities in Sakhri Khurd Village


पावसाळा सुरु होण्यापूर्वी साखरी बुद्रुक खुर्दमधील ग्रामस्थांनी अंकुर 101 या जातीचे 15 किलो भात बियाणे शेतात रुजत घातले. भात रोप लावणीसाठी तयार झाल्यावर 21 जुलैचा रविवार भातलावणीसाठी निश्चित करण्यात आला. रविवारी कुणबी एकता सामाजिक संघटनेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष अनंत सुवरे यांच्यासह चाकरमानी गावाला आले. ग्रामीण अध्यक्ष सुभाष शितप, सचिव सुनील वरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी लावणी अभियानाचे नियोजन केले. यामध्ये रोप काढणे, रोप लावणे, नांगरणी याबरोबरच शेतावर आणायचा चहा, दुपारचे भोजन अशा बारीकसारीक गोष्टींचा समावेश होता. Social Farming Activities in Sakhri Khurd Village


रविवारी सकाळी 80 ते 85 महिला पुरुष शेतात दाखल झाले. रोप काढुन त्याच्या मुठी बांधण्यात आल्या. ज्या शेतात लावणी करायची तेथे नांगरणी सुरु झाली. रोपांच्या मुठी लावणी योग्य शेतात महिलांपर्यंत पोचु लागल्या. सर्वांचा उत्साह वाढविण्यासाठी ज्येष्ठ मंडळी लावणीगीते सांगत होती. अशा उत्साहाच्या वातावरणात दिवसभरात दिड एकर क्षेत्रावरील लावणी पूर्ण झाली. सामाजिक शेतीच्या या उपक्रमामध्ये उपसरपंच राजु पवार, ग्रामसेवक महेंद भुवड, ग्रामपंचायत सदस्य समीर पेडणेकर, चंद्रकांत म्हसकर, मारुती मोहिते, रमेश पवार, दिपक पवार, पोलीस पाटील अमित पवार, दिगंबर हळदणकर हे देखील उपस्थित होते. Social Farming Activities in Sakhri Khurd Village

