रत्नागिरी, ता. 22 : ग्वाल्हेर घराण्याचे वारसा जपणारे ज्येष्ठ गायक व वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र श्रीपाद राजाराम पराडकर (वय ७९) यांचे काल रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. Shripad Paradkar is No More
ग्वाल्हेर घराण्याचे गायक व पद्मभूषण सी. आर. व्यासांचे गुरु गायनाचार्य (कै.) पं. राजाराम बुवा पराडकर यांचे ते सुपुत्र. त्यांचा वारसा त्यांनी अखेरपर्यंत चालवला. राजारामबुवांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त रत्नागिरीत ‘स्वर वंदना’ मैफलीचे आयोजित महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय व खल्वायन संस्थेने केले होते. त्यामध्येही श्रीपादबुवांनी सुरवातीला बंदिश सादर केली होती. तसेच अलीकडेच वेरळ गावी रामनवमीच्या उत्सवातही त्यांनी गायन सेवा केली होती. तीच ग्रामस्थांची शेवटची भेट ठरली. बुवांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना रत्नागिरीतील संगीतप्रेमी व वेरळ ग्रामस्थांनी आदरांजली वाहिली. Shripad Paradkar is No More


श्रीपादबुवांना वडिल गायनाचार्य स्व. पं. राजारामबुवा आणि संगीत शिक्षिका स्व. मनोरमा पराडकर यांच्याकडून गायनाचे सुरवातीचे धडे मिळाले. त्यानंतर अनेक वर्षे पद्मभूषण पं. सी. आर. व्यासजी (पं. राजारामबुवा पराडकर यांचे शिष्य) यांच्याकडून कठोर प्रशिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी एका स्पर्धेत त्यांनी प्रसिद्ध भूपाली सादर केली. खरे तर त्यांच्या वयोगटासाठी भूपाली नव्हती. घनश्याम सुंदरा ही भूपाली सादर करून त्यांनी दिग्गज व्ही. शांताराम यांनी विशेष पारितोषिक दिले होते. Shripad Paradkar is No More
अत्यंत लवचिक आवाजाची देणगी असलेल्या श्रीपादबुवांनी विविध प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले. त्यांनी भारतीय विद्या भवन संगीत आणि नर्तन शिक्षणपीठ (मुंबई) येथे अनेक तरुण आणि नवोदित प्रतिभांना प्रशिक्षण दिले. आकाशवाणी, मुंबई येथे मान्यताप्राप्त कलाकार होते. त्यांची मुलगी गायिका दीपा साठे आणि मुलगा ललित पराडकर हेही संगीताचा वारसा चालवत आहेत. श्रीपादबुवांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. Shripad Paradkar is No More