पंचायतन पूजा, कुंभमेळा, आखाड्यांची निर्मिती केली; व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी, ता. 02 : कित्येक वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यात असलेले वाद आणि भेद आदि शंकराचार्य यांना परिक्रमेतून आणखी जवळून अनुभवता आले. हा वाद मिटावा आणि संप्रदाय विशेष कमी व्हावा, यासाठी त्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. आजही आधुनिक काळात अनेकांच्या देवघरात ही पंचायतन पूजा पाहायला मिळते. याखेरीज सर्व संप्रदाय एकत्र यावेत यासाठी कुंभमेळा सुरू करून दशनामी आखाडे यांची देखील निर्मिती केली या दशनामी आखाड्यातील प्रत्येकाचे कार्य देखील ठरवून दिलं. परदेशी अधर्मी लोकांचे आक्रमण नियंत्रित ठेवण्यापासून ते अगदी सागर आणि महासागरांच्या रक्षणाची जबाबदारी, पर्वत, शिखरे यांचे रक्षण व त्यांच्या नैसर्गिक वैविध्याची सुरक्षितता अशा जबाबदाऱ्या त्या त्या आखाड्यानुसार दिल्या होत्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जसा यज्ञ करणारा पवित्र होतो, तसा यज्ञ देखील शुचिर्भूत व्हावा यासाठी यज्ञातील पशुहिंसा सर्वात आदि शंकराचार्यांनी बंद केली, असे प्रतिपादन प्रवचनकार, व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांनी केले. ते जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एक दिवसीय चर्चासत्रात बोलत होते. Seminar at Ratnagiri
या चर्चासत्राचे आयोजन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात करण्यात आले होते. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वां. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने आयोजित आणि नवी दिल्लीतील भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. Seminar at Ratnagiri
श्रीनिवास पेंडसे म्हणाले की, जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी एकात्म भारताचा विचार आपल्या कार्यातून नेहमीच केला आणि त्याच अनुषंगाने आपलं कार्य चालू ठेवलं. भारताची परिक्रमा करत असताना जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी समाजातील आणि संप्रदायातील भेदभावांचं उच्चाटन केलं आणि समाज आणि संप्रदाय एकसंध कसा राहील, याचाच प्रयत्न केला. आदि शंकराचार्य यांनी परिक्रमेतून समाजाचा अवलोकन केलं तेव्हा त्यांना समाजात अनेक भेद असलेल्या आढळून आले आणि याच भेदांचे उच्चाटन आदी शंकराचार्यांनी आपल्या कार्यपद्धतीनुसार केलं. ज्यामुळे आदि शंकराचार्य यांचा व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन उधृत होतो. Seminar at Ratnagiri
दुपारच्या सत्रात शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान आणि स्तोत्र वाङ्मय हा विषय स्पष्ट करताना प्रा. अंजली बर्वे म्हणाल्या की, आदि शंकराचार्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काठीण्य पातळी तपासणाऱ्या अशा ब्रह्मसुत्रांवर भाष्य केलं आणि दुसऱ्याच बाजूला सामान्य लोकांसाठी सुटसुटीत अशा स्तोत्रांची रचना देखील केली. यावरून आदि शंकराचार्य दोन्ही टोकांवर समाजाचे प्रबोधन करत होते, हे स्पष्ट होतं. आपल्या कार्यातून शंकराचार्यांनी द्वैतवाद भेद मोडून काढला. भारताच्या परिक्रमेतून शंकराचार्यांनी ज्या ठिकाणांना, तीर्थक्षेत्रांना भेट दिली त्यावर स्तोत्रे रचली. या स्तोत्रांमधील वर्णन आणि तत्कालीन नैसर्गिक वैविध्य भारावून टाकणारे आहे. Seminar at Ratnagiri
या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरलं ते नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांचे मंत्रोच्चारण. या वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे चर्चासत्राला एक आध्यात्मिक आणि मांगल्याचा स्पर्श झाला होता. या चर्चासत्राला कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे प्रमुख उपस्थित होते. Seminar at Ratnagiri
समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या की, आदि शंकराचार्य यांचे व्यक्तिमत्व एका समाजसुधारकासारख आहे. समाजातील भेद संप्रदायात असलेले वाद हे आदि शंकराचार्यांनी दूर केले. चर्चासत्रातील समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले. आभार रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी मानले. Seminar at Ratnagiri