अठरा पगड समाजातील ग्रामस्थांच्या एकजुटीच्या समर्पणाचे व भक्तिभावाचे दर्शन
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील अडूर गावाचे ग्रामदेवत श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार, मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्ताने दि. २८ फेब्रुवारी ते ०३ मार्च या चार दिवसीय कालावधीत मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अडूर, कोंडकारूळ, बोऱ्या व बुधल या चतु:सीमेतील गावांची ग्रामदेवता सुंकाईदेवी आहे. Restoration ceremony of Adur Sunkaidevi Temple


टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालशेत येथील साईबाबा मंदिर ते अडूर सुंकाई मंदिर या पाच किलोमीटर अंतरावर ग्रामदेवतेच्या नवीन पाषाणमूर्तींची पायी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवीच्या संकासुराचा सहभाग व पारंपारिक वेशात महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेऊन केलेले नृत्य आणि खालुजा बाजाचा ठेका लक्षवेधी ठरले. तसेच नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दरम्यान जुन्या मूर्त्यां मधील कलशाच्या जलामधील दैवत्व नवीन देवतांमध्ये मंत्रोच्चाराच्या जयघोषात दैवत्व देण्यात आले. त्याचप्रमाणे प.पु. स्वामी गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य तपस्वी मठाधिपती प.पु.उल्हासगिरी महाराज, ओणी राजापूर यांचे हस्ते मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. Restoration ceremony of Adur Sunkaidevi Temple

