गुहागर, ता. 25 : अनधिकृत होर्डींग हटावच्या आदेशानुसार, गुहागर तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणांचा चेहरामोहरा बदललेला दिसून येत आहे. अशा होर्डींगमुळे सार्वजनिक ठिकाणांना बकालपणा येऊन त्यांचे विद्रूपीकरण झाले होते. ते काही प्रमाणात थांबले असून आता यापुढे अधिकृत होर्डींगवरही मर्यादा घालण्याची मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे. ‘Remove’ Hoarding
मुंबई घाटकोपर येथे महाकाय होर्डींग कोसळून झालेल्या भयंकर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर राज्यभरात अनधिकृत होर्डींग हटाव मोहिम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुकास्तरावरील सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या अनधिकृत होर्डींगवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ‘Remove’ Hoarding
गुहागर तालुक्यातील मुख्य सार्वजनिक ठिकाणे, नाके येथे अनधिकृत होर्डींग कोणतीही परवानगी न घेता लावण्यात येतात. कोणीही उठतो आणि होर्डींग लावतो. आजकाल विवाह सोहळे, वाढदिवस, निवृत्ती समारंभ अशा असंख्य कार्यक्रमांचे होर्डींग बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी लावले जातात. कालातरांने ते काढलेही जात नाहीत. स्थानिक प्रशासनही याकडे दुर्लक्ष करतात. हे होर्डींग तुटलेले, लटकलेले दिसून येतात. विशेष करुन वादळी-वारे, पावसाळ्यात त्यांची दैनाच उडते. सर्वत्र पसारा होतो. असे होर्डींग सार्वजनिक ठिकाणे बकाल करुन विद्रुपीकरण घडवून आणतात. आता घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डींगवर कारवाई होत आहे. अशी कारवाई केवळ घटनेपुरती नको, कायमस्वरुपी याला पायबंद घालावा व अधिकृत होर्डींग लावण्यावरही मर्यादा याव्यात, तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. ‘Remove’ Hoarding