जीवन शिक्षण शाळा गुहागर नं.1 चा दिमाखदार सोहळा
गुहागर, ता. 25 : नासा, इस्रो या अंतराळ संस्थांना भेट देण्याच्या उपक्रमासाठी सलग दोन वर्ष जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 मधील विद्यार्थ्यांची निवड होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी देखील गुणवत्ते कसोटीत अव्वल येऊ शकतात हे या शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिले. म्हणूनच या शाळेच्या व्यवस्थापन समितीने व पालकांनी विद्यार्थ्यांसह, शिक्षकांचे कौतुक शहरातून मिरवणूक काढून केले. Procession of Jeevan Shikshan School students
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, जिल्हा परिषद शाळांमधील गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमामध्ये निवड होण्यासाठी चार टप्पात होणाऱ्या परीक्षांची काठिण्य पातळीदेखील युपीएसी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसारखी आहे. अशा निवड परिक्षांमध्ये जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 चे 5 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सोहम बावधनकर या विद्यार्थ्यांने तर दोनवेळा या स्पर्धांमध्ये यश मिळवले. इतकेच नाहीतर यावर्षीच्या निवड स्पर्धेत जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळवला. या विद्यार्थ्यांमधील निर्विघ्न नकुल वायंगणकरचे वडिल मच्छीमार तर आई एका दुकानात काम करते. सानवी जांगळीची आई गृहिणी आहे तर वडिल बांधकाम क्षेत्रात काम करतात. कौशल धनावडेचे वडिल इलेक्ट्रीकलच्या दुकानात काम करतात. अभिनव शिंदेचे वडिल शिक्षक आहेत तर सोहमचे वडिल छायाचित्रकार आहेत. अशा सामान्य कुटुंबातील ही सर्व मुले आहेत. Procession of Jeevan Shikshan School students
नासा आणि इस्रो निवड चाचणीची तयारी करुन घेणाऱ्या पदविधर शिक्षिका सौ. नेहा जोगळेकर म्हणाल्या की, यावर्षीच्या निवड चाचणीची तयारी आम्ही फेब्रुवारी 2024 पासून सुरु केली होती. गणपती विसर्जनाची एक सुट्टी वगळता अन्य कोणतीही सुट्टी या परीक्षेची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांनी घेतलेली नाही. पहिली पासून ते आठवी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम त्यांनी इतक्या वेळा केला आहे की, कोणता विषय कोणत्या पाठ्यपुस्तकातील कितव्या पानावर आहे हे देखील त्यांना माहिती झाले आहे. या तयारीमध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळेचे मार्गदर्शक श्री. राजेंद्र खांडेकर सर व सोहम् बावनधनकरची आई सौ. सई बावधनकर, शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचेही सहाय्य आम्हाला मिळाले. Procession of Jeevan Shikshan School students
अशाप्रकारे वर्षभरातील वेगवेगळ्या आलोभनांना, प्रलोभनांना दूर ठेवून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा अभ्यास करुन घेण्याऱ्या शिक्षकांना या मेहनतीचे फळ मिळाले. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 मधील 5 विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमासाठी झाली. म्हणूनच या विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतूक करण्याचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी केले. Procession of Jeevan Shikshan School students
24 जानेवारीला या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मिरवणूक काढण्यात आली. शाळा, बाजारपेठ, कुलस्वामिनी चौक मार्गे किर्तनवाडीतून पुन्हा शाळेपर्यंत अशा मार्गावरुन ही मिरवणुक निघाली. यावेळी गुहागरवासीयांनी या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. यावेळी गुहागरच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धावडे, उपाध्यक्षा सौ. सई बावधनकर, सर्व पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक ईश्वर वासावे, शिक्षक सौ. मृणाल झगडे, श्री अमोल धुमाळ, श्री. ईश्वर हलगरे, संजय आवटे, सौ. मुक्ता बेंडल, श्री. राजु सुर्वे, सौ. बागल, सौ. गायकवाड तसेच पालक उपस्थित होते. Procession of Jeevan Shikshan School students