मढाळ येथे बचत समुहाने केली एक एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड
गुहागर, ता. 27 : वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेती करण्यापासून दुरावत असताना पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मढाळ येथील ओंकार स्वयंसहाय्यता समुह व सरस्वती स्वयंसहाय्यता बचत समुहाने एकत्र येत सामुहिक नाचणी लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुमारे एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. Planting ragi at Madhal
रत्नागिरी जिल्ह्यातील भात व नाचणी ही खरीप हंगामातील प्रमुख पिके असून गुहागर तालुक्यात पूर्वी रानोमाळ नाचणीचे पिके घेतली जात होती. मात्र वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे सातत्याने नुकसान सहन करण्यापेक्षा काही शेतक-यांनी नाचणीची शेतीच सोडून दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील नाचणी पिकाचे क्षेत्र कमी होत चाललंय. काही गावात तर पिक कापणी प्रयोगासाठी नाचणी पिकच सापडेनासे झाले आहे. मात्र आहारात महत्वाचे पौष्टिक स्थान असलेले नाचणी हे पिक शेतक-यांनी टिकवणे आवश्यक आहे. यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सातत्याने वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रात्यक्षिक आयोजित करून शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशातच सामुहिकपणे अशा पिकांची लागवड केल्यास व संरक्षण केल्यास रानटीप्राण्यांपासून पिक वाचविणे सोपे होईल हा विचार करून पंचायत समिती गुहागर ने प्रात्यक्षिक स्तरावर कोतळूक व मढाळ या गावात बचत समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम केला आहे. Planting ragi at Madhal
या उपक्रमांतर्गत मढाळ येथील ओंकार स्वयंसहाय्यता समुह व सरस्वती स्वयंसहाय्यता समुहाने सुमारे एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली आहे. पंचायत समितीकडून या प्रात्यक्षिक उपक्रमासाठी लागवडीसाठी लागणारे रासायनिक खत ( 19:19:19) उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून महिला शेतक-यांना आवश्यक मार्गदर्शन केले. Planting ragi at Madhal