महाराष्ट्र दिनी ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाची सांगता
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अडूर येथे ०१ मे रोजी ग्रामदेवता सुंकाई मातेच्या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्ताने उद्या शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ १०.०० वा. रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित अशा निमंत्रित पालखी नृत्य पथकांचा भव्य पालखी नृत्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या पालखी नृत्यासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. Palkhi Dance Festival at Adur


यामध्ये पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गताम्हाणे, श्री सोमेश्वर पालखी नृत्य कलापथक मुंढर, श्री हसलाई देवी पालखी नृत्य कलापथक वरवेली, श्री चंडिकाई पालखी नृत्य कलापथक मळण या संघांचा सहभाग असेल. यावेळी ढोल वादक, ताशा वादक, निशाणवाला, झांज वादक, सनई वादक, लक्षवेधी देखावा पाहायला मिळणार आहे. Palkhi Dance Festival at Adur


गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी लोकांचा अत्यंत आत्मियतेचा सण. शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याच्या प्रथेतून कोकणात आता आधुनिक ‘पालखीनृत्या’चा जन्म झाला आहे. कोकणात पालखी नाचवण्याची पूर्वापार प्रथा आहे. शिमग्यात वर्षातून एकदा देवळातले देव रूपे लावून पालखीतून मोठ्या उत्साहात गावात भोवनीसाठी जातात. अडूर ग्रामदेवता सुंकाईदेवीच्या खेळ्यांच्या भोवनीची सांगता होळीच्या आदल्या दिवशी होते. तसेच होळीच्या दिवशी ग्रामदेवता सुंकाईदेवीला रूपे लावून धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवसापासून पालखी गाव भोवनीसाठी जाते. यामध्ये अडूर सह कोंडकारूळ, बोऱ्या व बुधल या चतु:सीमेतील गावांची ग्रामदेवता सुंकाईदेवी असल्याने या गावामध्ये देवी भक्तांच्या भेटीला जाते. चतु:सीमेतील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान, भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी व माहेरवाशींची पाठराखीण असलेली अशी तिची ओळख आहे. Palkhi Dance Festival at Adur