गुहागर, ता. 15 : फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया मुंबई, विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई, एस.एस.डी. ट्रस्ट संचालित एस.एस.डी. समाजिक विकास केंद्र शृंगारतळी, पाटपन्हाळे महाविद्यालय आणि खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्रदूषण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. १५ ऑक्टोबर रोजी पाटपन्हाळे महाविद्यालयात दुपारी ३ ते ५ वाजताच्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. Marine plastic pollution awareness
जागतिक स्तरावर जल, वायु व जमीन प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे. नदी-नाल्यातून वाहून समुद्रात गेलेला प्लास्टिक कचरा, महिनोमहिने समुद्रात चालणाऱ्या जाहजातून फेकला जाणारा प्लास्टिक व इतर कचरा, यामुळे समुद्री जलप्रदूषण अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. अशा जल प्रदूषणाचा परिणाम मासे, कोळंबी, शेवंडा, शिंपले, खेकडे, ऑक्टोपस अशा लाखो प्रकारच्या समुद्री जलचरांवर होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. परिणामी, किनारपट्टीत राहणाऱ्या मच्छिमार बांधव व सामान्य जनता यांचेही अर्थकारण व जीवनमान बाधित झाले आहे. प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी जगभरातील राष्ट्रांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून भारत सरकारनेही ‘फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया’ च्या माध्यमातून भारताच्या समुद्रकिनार पट्टीत राहणाऱ्या मच्छिमार बांधव, सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी इ. मध्ये प्लास्टिकद्वारे होणाऱ्या सागरी प्रदूषणाबद्दल जागृती मोहीम आखली आहे. Marine plastic pollution awareness
या कार्यक्रमाला आ. भास्कर जाधव, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ह्याबाबत शासन आणि समाज यांच्या सहकार्यातून कोणते प्रयोग राबवता येतील याची माहिती दिली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांनुसार, होणाऱ्या या कार्यक्रमास मच्छिमार बांधव, विद्यार्थी, युवक, महिला व सामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे व सागरी प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Marine plastic pollution awareness