गुहागर, ता. 18 : एका बाजुला महायुतीचा मेळावा, बैठका, संपर्क याद्वारे सुरु असताना महाविकास आघाडीचा प्रचार मात्र गुप्तपणे सुरु आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रेतील सभा झाल्यानंतर गुहागर विधानसभा क्षेत्रात कुठेही या आघाडीचा मेळावा, सभा झालेली नाही. उबाठा सेनेचे प्रवक्ते आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्या बैठका, सभांची चर्चाही अजुन सुरु झालेली नाही. Mahavikas Aghadi secret campaign
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची गुहागर तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे. कायमच राष्ट्रवादीबरोबर मिळत जुळतं घेता घेता या पक्षाचे येथील अस्तित्वच धुसर झाले. इथे पारंपरिक मतदार असलेल्या काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी, उभारी देण्यासाठी गेल्या 20-25 वर्षात कोणतेही प्रयत्नच पक्ष नेतृत्त्वाने केलेले नाहीत. आघाडीचा प्रणेता मानल्या जाणाऱ्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे उबाठा सेनेएवढे नसले तरी बऱ्यापैकी कार्यकर्ते आहे. मात्र या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची क्षमता असलेला नेता इथे दिसत नाही. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम या कार्यकर्त्यांना किती बळ आणि दिशा देतात त्यावर येथील कार्यकर्ता प्रचाराच्या कामाला लागेल. त्यामुळे खासदारकीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सर्वस्वी जबाबदारी उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार भास्कर जाधव यांच्याच खांद्यांवर आहे. मात्र उबाठा सेनेत जुने कार्यकर्ते आणि आमदार जाधव समर्थक कार्यकर्ते असे दोन गट आहेत. Mahavikas Aghadi secret campaign
आमदार भास्कर जाधव यांनी गेल्या 15 वर्षात निवडणुकांच्या प्रचाराची स्वतंत्र संस्कृती येथे रुजवली. त्यांच्या प्रचार सभा कितीही छोट्या क्षेत्रातील असल्या तरी त्या सभेची प्रसिध्दी, त्या सभेमध्ये किमान 50-60 पक्ष प्रवेश, आक्रमक, चिमटे काढणाऱ्या भाषणांतून वातावरण निर्मिती, कार्यकर्त्यांना उत्साह देणारी वक्तव्य असे स्वरुप लोकांना माहिती झाले आहे. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अशा स्वरुपाची त्यांची सभा झाल्याचे प्रसार माध्यमे, सामाजिक माध्यमांमधुन कळलेले नाही. सध्या ते अन्य मतदारसंघात प्रचार दौरे करत आहेत. लोकसभेच्या प्रचाराची धुरा त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यावर सोपविली आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर प्रत्येक पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांकडे त्या गणातील बुथप्रमुख, बुथ कमिटी सदस्य, अन्य पदाधिकारी यांची यादी करण्यास सांगितले होते. ही यादी आमदारांच्या संपर्क कार्यालयात पोचविण्यासाठी गेलेल्या काही गणातील कार्यकर्त्यांनाही आमदार जाधव भेटलेले नाहीत. Mahavikas Aghadi secret campaign
महाविकास आघाडीच्या प्रचाराबाबत उबाठा सेनेच्या एका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सध्या गुप्तपणे भेटीगाठी घेणे सुरु आहे. पुढील आठवडाभरात पंचायत समिती गणनिहाय सभांचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. Mahavikas Aghadi secret campaign