रत्नागिरी, ता. 23 : स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, त्यासाठी कठोर मेहनत घ्या, कोणतीही गोष्ट मन लावून करा, संयम आणि विनयशीलता ठेवा या पंचसूत्री आधारे विद्यार्थिनींनी यश मिळवावे, असे आवाहन प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. Maharshi Stree Shikshan Sanstha’s Annual Snehasamelan program
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए, नर्सिंग व फॅशन डिझायनिंग कॉलेजच्या उत्कर्षम् या वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण सोहळ्यात शनिवारी संस्थेच्या पवार सभागृहात ते बोलत होते. या वेळी प्रकल्प सदस्य प्रसन्न दामले, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, बीसीएसच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेजच्या प्र. प्राचार्य अर्चना बाईत, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या वेळी पोलिस अधीक्षकांचा सत्कार दामले यांच्या हस्ते करण्यात आला. Maharshi Stree Shikshan Sanstha’s Annual Snehasamelan program


कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी कर्वे, बाया कर्वे व भारतमाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. स्मिता सुतार यांनी मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा वापर कसा करावा, दक्ष राहिले पाहिजे यासंदर्भात माहिती दिली. सायबर पोलिसांचे कार्य आणि सायबर क्राईम संदर्भात महत्त्वाची माहिती देऊन सोशल मीडियाचा जपून वापर करण्याची माहिती समजावून सांगितली. मिस उत्कर्षमचा सन्मान खुशी गोताड हिला तर द्वितीय क्रमांक हर्षिता शेट्ये हिला मिळाला. एसवायबीसीएच्या वर्गाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या विद्यार्थिनींनी बक्षीस घेताना जल्लोष केला. उत्कर्षममध्ये क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. यात रस्सीखेच, डॉजबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, मेहंदी, रांगोळी, वादविवाद, निबंध लेखन, पोस्टर मेकिंग, गुगल हंट, कोडिंग, फोटोग्राफी, फॅशन शो यांचा समावेश होता. प्रा. निमिषा शेट्ये यांनी आभार मानले. Maharshi Stree Shikshan Sanstha’s Annual Snehasamelan program