प्रतिस्पर्धी उमेदवार ठरले, चैत्र, वैशाखाच्या वणव्यात प्रचाराला गती येणार
गुहागर, ता. 06 : लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशात व महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात, कधी मतदान होणार याच्या तारखाही जाहिर झाल्या आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या लगतच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. रायगड मतदारसंघात पूर्वीचे राष्ट्रवादीचे खासदार आणि यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा सुनील तटकरे यांना संधी मिळाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार उबाठाचे अनंत गीते हे मशाल घेऊन लढतीच्या मैदानात आहेत. एकूणच निवडणुकांच्या या धामधुमीत रायगडला आता खऱ्या अर्थाने जाग आली आहे, असे म्हणता येईल. Lok Sabha Elections
शिमगोत्सवाची धामधूम आताच संपली. गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या गळाभेटी, घरभोवनी, त्यानिमित्ताने होणारे कार्यक्रम, त्याजोडीला लग्नसराई आणि त्यातच तापमान वाढ, चैत्रापासूनच सुरु झालेला उष्माचा वणवा, ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई अशा भरगच्च गोष्टींना बगल देत राजकीय निवडणुकांचा वणवा सुरु झाला आहे. रायगड मतदारसंघात उमेदवार जाहिर झालेले असले तरी अजूनही तशी राजकीय वातावरणनिर्मिती सुरु झालेली नाही. अपवाद गुहागर मतदारसंघात अनंत गीते यांच्या समर्थनार्थ उद्ध्व ठाकरे यांची जाहीर सभा, शिंदे गटाचे रामदास कदम यांनी खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत गीते यांच्यावर केलेली टीका अशा दोन भरगच्च सभा सोडल्या तर खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात, प्रचाराला रायगड मतदारसंघात सुरुवात झालेली नाही, असे सध्याचे चित्र आहे. Lok Sabha Elections
अलिकडच्या एक-दोन वर्षात राज्याच्या राजकारणाचे चित्र पूर्णतः बदलले आहे. गटा-तटाचे राजकारण, पक्षबदल यामध्येच प्रत्येक नेता गुंतलेला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाच्या वळचणीला जाऊन बसलेला अजित पवार गट असो की, उद्ध्व ठाकरे गट, काँग्रेस वा शरद पवार यांचा महाविकास आघाडीचा प्रयोग असो सगळेच एकाच माळेतील हे मणी राजकारण ढवळून काढत आहेत. रायगड मतदारसंघाचा विचार केला तर सुरुवातीला भाजपकडून शेकापचे धैर्यशील पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, महायुतीच्या झालेल्या जागा वाटपात अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहिर झाली आणि तटकरेंच्या येथील ५ वर्षांच्या भक्कम तटबंदीला पुन्हा एकदा दिलासा मिळाला. त्यातच सुनील तटकरे यांची कन्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांनी गुहागर पंचायत समितीच्या एका कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थित अंगणवाडी कर्मचारी व इतर महिलांची मने जिंकली. Lok Sabha Elections
लोकसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघाचा विचार केला तर सुनील तटकरे यांना रायगडमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली असली तरी गेल्या पाच वर्षाच्या आपल्या खासदारकीच्या कारकीर्दीत गुहागरकडे तसे ते फिरकलेलेच नाहीत. कधीतरी गुहागर दौऱ्यावर येऊन घोषणा करुन वा आश्वासने देऊन जायची एवढेच सोपस्कार त्यांनी उरकले. कुठलीही संघटन बांधणी नाही. अजूनही गुहागर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता शरद पवार वा अजित पवार गटात आहे तेच समजत नाही, अशी येथील राजकीय स्थिती आहे. त्यामुळे गुहागरच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेल्या तटकरे यांना येथील मतदार किती स्वीकारतील, हा एक प्रश्न आहे. मात्र, महायुती म्हणून तटकरेंच्या झोळीत भाजपची व काही प्रमाणात शिंदे गटाची मते मिळणार असल्याने सध्या तरी त्यांची मतांची तटबंदी सुस्थितीत आहे. अर्थात, हे महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. Lok Sabha Elections
याउलट स्थिती उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांची आहे. केवळ समाजाच्या मतांवर निवडून येणारे व्यक्तीमत्व अशी अनंत गीते यांची ओळख काही विरोधक करुन देतात. गेल्या महिन्यात रामदास कदम यांच्या गुहागरमधील सभेत त्यांनी अनंत गीते यांच्यावर जे काही तोंडसुख घेतले ते मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारे नक्कीच आहे. ‘गीतेंनी मला पाडले’ या आरोपासून ते ‘समाजाच्या जीवावर निवडून येणारा खासदार’ अशी रामदास कदम यांनी गीते यांची केलेली संभावना हा एक राजकीय मुद्दा मतदारांना विचार करायला लावणारा ठरणार आहे. Lok Sabha Elections
दुसरीकडे उबाठाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावरच अधिक भिस्त असल्याने व उद्ध्व ठाकरेंच्या सभेत आ. जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून गीतेंना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा केलेला निर्धार व उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द यामुळे गीतेंचे पारडे गुहागरमध्ये सध्या तरी जड असल्याचे बिंबविले गेलेले आहे. एकूणच बदलत्या राजकीय प्रवाहाचा कितपत परिणाम रायगड मतदारसंघाच्या निवडणुकीत या दोन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांवर होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Lok Sabha Elections