दि. ९ फेब्रुवारी रोजी आयोजन; हभप रोहिणी माने-परांजपे करणार कीर्तन
रत्नागिरी, ता. 30 : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे (कै.) शरद अनंत पटवर्धन स्मृतीनिमित्त गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत स्वा. सावरकर नाट्यगृहात कीर्तनचंद्रिका हभप रोहिणी माने-परांजपे वारकरी कीर्तन सादर करणार आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी एक म्हणजे (क्रमांक १६) शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी गजर कीर्तनाचा हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली. Kirtan by Asamant, Chitpavan Brahmin Mandal
कार्यक्रमासाठी खल्वायन संस्था सहकार्य करणार आहे. हभप परांजपे यांना गायनसाथ गायनाचार्य हभप गोरख महाराज गतीर, हभप कुंदन महाराज बोरसे, मृदुंगसाथ मृदुंगाचार्य हभप चेतन महाराज तरे, ऑर्गन कौस्तुभ परांजपे आणि तबलासाथ निखील रानडे करणार आहेत. ह.भ.प.सौ. रोहिणी कौस्तुभ परांजपे यांचे शिक्षण एम. ए.(संगीतशास्त्र), एस.एन.डी.टी. विद्यापीठ, पुणे, एम. ए .(मराठी) पुणे विद्यापीठ, बी.ए.(कीर्तनशास्त्र), बी.एड. (पुणे विद्यापीठ) आणि संगीत विशारद (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) येथे झाले आहे. ह.भ.प. कीर्तनकलाशेखर नारायणबुवा काणे (कोल्हापूर), राष्ट्रीय कीर्तनकार, ह.भ.प. श्री. न. चि. अपमार्जने (पुणे) आणि राष्ट्रीय कीर्तनकार, ह.भ.प. चारुदत्त आफळे (पुणे) हे त्यांना गुरुस्थानी आहेत. Kirtan by Asamant, Chitpavan Brahmin Mandal
वयाच्या अकराव्या वर्षापासून कीर्तन सेवेला प्रारंभ केला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कीर्तन सेवा केली आहे. त्यांना अखिल भारतीय युवा नारदीय कीर्तन संमेलनप्रथम क्रमांक मिळाला आहे. श्री हरी कीर्तनोत्तेजक सभेचा (पुणे) युवती कीर्तनकार तसेच कीर्तन चंद्रिका पुरस्कार, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने युवा कला गौरव पुरस्कार, उज्जैन (मध्य प्रदेश) येथे झालेल्या नारदीय कीर्तन संमेलनामध्ये कीर्तन रत्न पदवीने सन्मानित आहेत. नारदीय आणि वारकरी या दोन्ही लोकप्रिय कीर्तन परंपरांची सेवा त्या करत आहेत. विविध वाहिन्यांवर त्या कीर्तन करतात. Kirtan by Asamant, Chitpavan Brahmin Mandal
कीर्तनप्रेमी रसिकांसाठी कार्यक्रम विनाशुल्क असून सन्मानिका ३ ते ८ फेब्रुवारीपर्यंत सुरस स्नॅक्स, परटवणे, पटवर्धन उपाहारगृह, गाडीतळ, रसराज, टिळक आळी, अनंत वस्तू भांडार, मारुती मंदिर, आगाशे स्टोअर्स, नाचणे रोड, समर्थ कृपा, कुवारबाव येथे उपलब्ध होतील. रत्नागिरीमध्ये बऱ्याच कालावधीनंतर वारकरी कीर्तनाचा आस्वाद घेण्याची रसिकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे. Kirtan by Asamant, Chitpavan Brahmin Mandal