प्रो कबड्डी व अॅमेचर फेडरेशनच्या नियमामधील फरक लक्षात घेणे; नितीन कदम
गुहागर, ता. 25 : कबड्डी हा खेळ इतर खेळांपेक्षा आव्हानात्मक आहे. या खेळात प्रामुख्याने पंचांची सत्त्वपरीक्षा लागलेली असते. मुळातच हा खेळ वेगवान आहे. त्यात एखाद्या खेळाडूने विरोधी खेळाडूला केलेला अगदी अलगद स्पर्श किंवा बोनस रेषा नियमानुसार पार झाली किंवा नाही या गोष्टी टिपणे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत पंचांकडून थोड्याफार चूका होणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘पंचांचा निर्णय अंतिम’ या तत्वाला या खेळात विशेष महत्व देणे गरजेचे आहे. खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक आहे. अगदीच स्पष्ट चुकीचा निर्णय असला तर खेळाडूंनी निषेध नोंदवणे चुकीचे नाही मात्र असे करतांना खेळाडूंनी आपल्या मर्यादा ओलांडता कामा नये. त्याचबरोबर खेळाडू, टीम मॅनेजर व कोच यांना सुद्धा कबड्डी खेळाचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. व्यावसायिक प्रो कबड्डी व अॅमेचर संघटना (हौशी कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया) चे नियम यातील फरक लक्षात घेणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच व महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच कमिटी सदस्य नितीन कदम यांनी केले. यावेळी राष्ट्रीय कबड्डी पंच व चिपळूण तालुका कबड्डी पंच प्रमुख सुरज पवार यांनी सुद्धा या शिबीरा दरम्यान उपस्थितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adoor
सदर शिबीर महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या अडूर श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) तर्फे तालुक्यामध्ये प्रथमच एकदिवसीय तालुकास्तरीय कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. सदर शिबीर दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी श्री. विठ्ठलाईदेवी मंदिर, अडूर येथे पार पडले. या शिबीर दरम्यान एकूण ५६ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री. निलेश खेडेकर यांनी काम पाहिले. यावेळी मंडळातर्फे उपस्थितांना मोफत जेवण व्यवस्था करण्यात आली. शिबीर यशस्वीतेसाठी श्री. विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूरचे पदाधिकारी, सभासद व महिला वर्गाचे सहकार्य लाभले. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adoor