रत्नागिरी, ता. 04 : जैन धर्मातील पवित्र चातुर्मासासाठी तीन मुनि येत्या ७ जूनपासून रत्नागिरीत दाखल होणार आहेत. गुरु पू. मुनि जयधर्मशेखर विजयजी महाराज यांच्यासोबत पू. मुनि श्री प्रभुप्रेमशेखर विजयजी म. सा., आणि पू. मुनि श्री योगदृष्टिशेखर विजयजी म. सा. येणार असून ते धार्मिक प्रवचने देणार आहेत. Jain holy month of Chaturmas
मुळचे रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील जिनेश्वर इंटेरिओचे मालक प्रकाश जैन यांनी १९ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्व सांसारिक त्याग करून महाजन क्रीडा संकुल येथे झालेल्या दीक्षा समारंभात प. पू. आचार्य अजितशेखर सुरीश्वरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा घेतली. त्यांचे नामकरण पू. मुनि प्रभूप्रेमशेखर विजयजी म. सा. असे केले. त्याच वेळी रत्नागिरीतील लालचंद सराफ ज्वेलर्सचे भरत जैन यांनीही दीक्षा घेतली. दीक्षेनंतर त्यांचे नामकरण पू. मुनि श्री योगदृष्टिशेखर असे करण्यात आले. दीक्षा घेतल्यानंतर हे दोघेही मुनि प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. Jain holy month of Chaturmas
गुरु पू. मुनि जयधर्मशेखर विजयजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली जैन मुनि अनवाणी पायी प्रवास करत आहेत. रत्नागिरीत येण्याकरिता त्यांनी पनवेल येथून प्रवासाला सुरवात केली. हा प्रवास अतिशय खडतर, कठीण प्रवास आहे. या मार्गावर पेण, पनवेल, म्हसळा, श्रीवर्धन आदी ठिकाणी त्यांनी प्रवचने दिली आहेत. ७ जून रोजी थिबा पॅलेस मार्गावरील जैन मंदिरात त्यांचे आगमन होणार आहे. तेथे ते एक महिना वास्तव्य करणार आहेत. त्यानंतर ७ जुलै रोजी रामनाका येथील श्री जैन मंदिरात चातुर्मासासाठी प्रवेश करतील. त्यांच्या आगमनाने जैन बंधू-भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरात सार्वजनिक धार्मिक प्रवचनांचेही आयोजन जैन बांधवांतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वानी दर्शन, वंदनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन समाजातर्फे करण्यात आले आहे. Jain holy month of Chaturmas