दुकाने, घरांमध्ये पाणी घुसले; रस्ते, भातशेती पाण्याखाली
गुहागर, ता. 09 : सोमवारी कोसळलेल्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला चांगलाच तडाखा दिला. धुवांधार पावसामुळे अनेक मार्गावर व पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नद्यां नाल्यांशेजारी भातशेती पाण्याखाली गेली होती. तर काही घरे व दुकानांमध्ये पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. Heavy rain in Guhagar
रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला होता. पावसाची संततधार सायंकाळपर्यंत कायम राहिल्यामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गुहागर खालचापाट भागातील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. असगोली वरचीवाडी गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. वाहने काही काळ बंद होती. या भागातील भातशेती सुध्दा पूर्णपणे पाण्याखाली गेलेली दिसत होती. गुहागर बस स्थानकासमोरील रस्त्याही पाण्याखाली होता. रिक्षा स्टॅन्ड अन्यत्र हलवण्यात आला होता. धुंवाधार पावसामुळे गुहागरसह शृंगारतळी, आबलोली बाजारपेठेत विक्रीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली होती. Heavy rain in Guhagar
पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील अनेक ठिकणी नद्यांना पूर आला होता. नद्यांची पाणी पातळी कमालीची वाढली होती. तर अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले. काही भागात रस्त्यांना गटारांचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पेवे गावातील मादाली व कोतलूक कासारी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. दरवषी पालशेत पुलावरून देखील पाणी जाते. मात्र, यावर्षी हा पूल नव्याने बांधण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक सेवेत कोणती अडचण आली नाही. Heavy rain in Guhagar
रविवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळीवाऱ्यामुळे उमराठ डागवाडीतील कृष्णा गोविंद गोरिवले यांचा गोठा कोसळून नुकसान झाले. मौजे कुटगिरी येथील आशा बाळू कदम यांच्या कच्चे घराचे पडवी पडून घरांचे अंदाजे १००९० रुपयांचे नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याच गावातील दत्ताराम बाळाराम पवार यांच्या गोठ्याचे ५००० रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी वरचापाट गुहागरकडे जाणाऱ्या मार्गावरील आरे – बाग पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाला आहे. नदीतील पुराचे पाणी शेजारील बागेमध्ये शिरले होते. तसेच आरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर देखील पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे शृंगारतळीमार्गे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. धोधो पावसामुळे वेलदुर नवानगर परिसराला फटका बसला. लगत दाभोळ खाडी असल्याने समुद्राला भरती आल्यास नवानगर (घटी) येथील कुटुंबांना व घराना आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही धोका टळलेला नाही. तरी या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Heavy rain in Guhagar
शृंगारतळी बाजारपेठ मधील गुलाम हुसेन तांडेल यांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने घरातील साहित्य भिजून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे वेळंब नालेवाडी सतीचा माळ या परिसरात वळणावर रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहने घेऊन जाण्यास अडचणीचे ठरले होते. या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती. गुहागर – रत्नागिरी महामार्गावरील आबलोली येथील चंद्रकला पेट्रोल पंपा समोर पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. पेट्रोल पंप व आजूबाजूच्या परिसरातून पावसाचे पाणी महामार्गावरून थेट समोरच असणाऱ्या नदीला जाऊन मिळत होते. त्यामुळे महामार्गावरती सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही वेळा नंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. शृंगारतळी बाजारपेठेतून शृंगारीकडे जाणाऱ्या मार्गावर नदीसारखे धोधो पावसाचे पाणी वाहत होते. लगतच्या दुकानांमध्येही पाणी शिरले होते. रोशन मोहल्ला येथे नूरजहाँ घारे यांच्या चाळीमध्ये पाणी शिरले होते. या परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. शृंगारतळीतील रामदास पांडुरंग बेलवलकर (गणेश नगर) यांच्या घराचे संरक्षण भिंत पडून अंदाजे १५ हजाराचे नुकसान झाले. Heavy rain in Guhagar
नवानगर येथील काशिनाथ पुनाजी खडपकर यांच्या घरात पाणी जाऊन त्यांचे मातीची भिंत, धान्य व घरगुती साहित्याचे अंदाजे १५ हजाराचे नुकसान झाले आहे. तसेच गणपत विश्राम शिरगावकर यांचे घरात पाणी जाऊन तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचे अंदाजे ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. धोपावे नविन वसाहत (गणेश नगर) परिसरातील घरामध्ये सायंकाळी पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. पाऊस आणखी काही काळ पाडल्यास या भागात मोठी नुकसानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शृंगारतळीतील संभाजी महादेव गावकर (गणेश नगर) यांच्या घराचे शेड तसेच संरक्षण भिंत पडून अंदाजे २७ हजार ५०० रुपये नुकसान झाले. ग्रामपंचायत पेवे कार्यक्षेत्रातील आरोग्य उपकेंद्र पेवे येथे खाडीला भरती असल्याने व पावसाचे पाणी घुसले. शृंगारतळीतील राऊत (गणेश नगर) यांच्या घराचे संरक्षण भिंत पडून अंदाजे १० हजाराचे नुकसान झाले. नवाज खान यांच्या कापड दुकानामध्ये पाणी शिरल्याने १ लाख ३० हजाराचे नुकसान झाले. Heavy rain in Guhagar