जिल्हा नियोजनमधून ९० टक्के अनुदान
गुहागर, ता. 09 : शहरांमध्ये कचरा साचू नये, यासाठी संकलन व प्रक्रिया यावर भर दिला जातो. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्येही ओला व सुका कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरी सुविधा घटक योजनेमधून गुहागर तालुक्याला एकूण ८ घंटागाड्या मंजूर झाल्या असून यामध्ये वेलदूर, अंजनवेल, पाटपन्हाळे, पालशेत, अडूर, वेळणेश्वर, पडवे, कोतळूक या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती गुहागर पंचायत समितीकडून देण्यात आली. यासाठी जिल्हा नियोजनमधून ९० टक्के अनुदान देण्यात आले आहे. Guhagarla bell carts for garbage collection


प्लास्टिक कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान आहे. शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागामध्येही प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे अशा कचऱ्याचे संकलन करून तो नष्ट करणे अशक्य होते. त्याचबरोबर गाववाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वच प्रकारचा कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी नागरी सुविधा घटक योजनेमधून प्रायोगिक तत्त्वावर मोठ्या ग्रामपंचायतीत कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जनगणनेनुसार तीन हजार व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना कचरा संकलन लागू करण्यात आला आहे. Guhagarla bell carts for garbage collection


संबंधित ग्रामपंचायतींमध्ये तयार होणारा प्लास्टिक कचरा घंटागाड्यांमधून गावागावात गोळा केला जाणार आहे. यामध्ये ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकाराचा कचरा साठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. या घंटागाडीची किंमत ८ लाख ४३ हजार रुपये आहे. त्यामधून एकावेळी ७५० किलो कचरा वाहन नेता येतो. ही गाडी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने १० टक्के म्हणजेच सुमारे ८४ हजार रुपये भरावयाचे आहेत. उर्वरित रक्कम अनुदान म्हणून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नावीन्यपूर्णमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या काही दिवसांत या गाड्यांचे वितरण केले जाणार आहे. Guhagarla bell carts for garbage collection
ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया
कचरा संकलन केल्यानंतर ग्रामपंचायतींनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नाडेपचा उपयोग करायचा आहे. त्यामध्ये विशिष्ट आकाराच्या टाकीमध्ये ओला कचरा संकलित करून तो कुजवला जातो आणि त्याद्वारे खत तयार करतात, तर सुका कचरा वर्गीकरण करून तो प्रक्रिया करण्यासाठी संबंधित कंपन्यांकडे पाठवला जाणार आहे. Guhagarla bell carts for garbage collection